मुंबई

अनंत चतुर्दशीसाठी पालिका सज्ज

CD

अनंत चतुर्दशीसाठी पालिका सज्ज
विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव; भाविकांच्या सेवेसाठी १२ हजार अधिकारी-कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : अनंत चतुर्दशीदिनी मंगळवारी (ता. १७) होणाऱ्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिका सज्ज झाली आहे. पालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी सुमारे १२ हजार अधिकारी-कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष सज्ज आहेत. ६९ नैसर्गिक स्थळांसह २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांवर विसर्जनाची व्यवस्‍था केली आहे, अशी माहिती उपआयुक्त (परिमंडळ दोन) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली.
मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे. विसर्जनासाठी येणारे वाहन चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत व विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, यासाठी चौपाटीच्या किनाऱ्यांवर ४७८ स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४३ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था केली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ७६१ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत, अशी माहिती उपआयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली. विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी १६३ निर्माल्य कलशांसह २७४ निर्माल्य वाहनांचीही सोय केली आहे.
महानगरपालिकेच्या विविध खात्यांतील कर्मचाऱ्यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १९२ नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहेत. तर, सुरक्षेच्या दृष्टीने ६६ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विविध ठिकाणी ७२ स्वागत कक्ष तयार केले आहेत.
आरोग्य विभागाकडून ७५ प्रथमोपचार केंद्रांसह ६७ रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’च्या सहकार्याने खांबांवर व उंच जागी सुमारे १,०९७ फ्लडलाइट आणि २७ सर्चलाइट लावले आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी १२७ फिरती प्रसाधनगृहे सज्ज ठेवली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

क्यूआर कोड स्‍कॅन करा!
पर्यावरणपूरक उत्सवासाठी महानगरपालिकेने यंदा तब्बल २०४ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. ‘क्यूआर कोड’द्वारेदेखील भाविकांना, गणेशभक्तांना या कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यावर कृत्रिम तलावांची माहिती आणि गुगल मॅप लिंक भाविकांना उपलब्ध होणार आहे. यामुळे मुंबईतील यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्यासाठी मदत होणार आहे. तसेच https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlGanpatiDeQR या लिंकवरूनही कृत्रिम तलावांची माहिती मिळू शकते.

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
सर्व विसर्जनस्थळी नागरिकांनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या तसेच विसर्जनस्थळी जबाबदारीने आणि सतर्कतेने वागावे. महानगरपालिका आणि मुंबई पोलिस दलाद्वारे दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

अशी असेल भरती- ओहोटीची वेळ
यंदा अनंत चतुर्दशीदिवशी (ता. १७) समुद्रात सकाळी ११.१४ वाजता ४.५४ मीटरची भरती, सायंकाळी ५.२२ वाजता ०.८६ मीटरची ओहोटी, रात्री ११.३४ वाजता ४.३९ मीटर उंचीची भरती असेल. दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. १८) पहाटे ५.२७ मिनिटांनी ०.४८ मीटरची ओहोटी, सकाळी ११.३७ वाजता ४.७१ मीटरची भरती असेल. या भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मत्स्यदंशापासून बचाव करा
ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. या पार्श्वभूमीवर विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच, १०८ रुग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT