सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : बहुचर्चित शेअर बाजार घोटाळ्यातील आरोपी केतन पारेखसह एका महिलेविरोधात वर्सोवा पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. एका व्यावसायिकाला सुमारे दोन कोटींना फसविल्याचा आरोप या दोघांवर आहे. वर्सोवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांनी याला दुजोरा दिला. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तक्रारदार आणि सहआरोपी महिला २०१५ पासून एकमेकांना ओळखतात. २०२०मध्ये महिलेने व्यावसायिकाची ओळख पारेख याच्यासोबत करून दिली. त्याच्या सल्ल्याने शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत जास्त नफा होईल, असे प्रलोभन त्याला दाखवले होते. भूलथापांना बळी पडलेल्या व्यावसायिकाने टप्प्याटप्प्याने दोन कोटी १७ लाख रुपये महिलेकरवी पारेख यांना दिले; मात्र गेल्या वर्षी गुंतवलेले पैसे आणि त्यावरील नफा मागताच पारेख आणि महिला या व्यावसायिकाला टाळू लागले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
-----
गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्न
सहआरोपी महिला आणि तक्रारदार व्यावसायिक भाड्याने घेतलेल्या घरात एकत्र राहत होते. ही महिला आणि पारेख यांच्यात मैत्री होती, असा आरोप व्यावसायिकाने केला. पैशांसाठी व्यावसायिकाने पारेख यांचे घर, कार्यालयात पाठपुरावा सुरू केला. अखेर ४२ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला; मात्र तो वटला नाही. त्यानंतर आरोपी महिलेने केलेल्या तक्रारीवरून व्यावसायिकाविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला; मात्र व्यावसायिकाने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला. यानंतर पारेख व महिलेने नियोजनपूर्वक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.