रतींद्र नाईक ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : कुणी डोळ्यांनी, कुणी हाताने तर कुणी पायाने अधू असणाऱ्या दिव्यांगाकडे समाज नेहमीच सहानुभूतीने बघतो, परंतु मुंबईतील सात मतदान केंद्रांवर मतदारांच्या मदतीसाठी दिव्यांगांची नेमणूक केली आहे. त्यामुळे सुदृढ लोकशाहीसाठी दिव्यांगांचा हातभार लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत मुंबईतील जे. जे. महाविद्यालय, अँटॉप हिल, माहीम, वरळी, काळा चौकी, मुंबई सेंट्रल आणि बाबूलनाथ, अशा सात ठिकाणी मतदान केंद्रावर दिव्यांगांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या सर्व मतदारांना दिव्यांग नागरिक मदत करणार आहेत. ईव्हीएम मशीनची जोडणी कशी करायची, फॉर्म कसे भरायचे, ईव्हीएम मशीन कसे हाताळायचे या सर्वांचे ट्रेनिंग दिव्यांगांना देण्यात आले असून, मंगळवारपासूनच त्यांना मतदान केंद्रावर तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या राहण्याची मतदान केंद्रावर सोय करण्यात आली असून, बदलापूर, कल्याण येथून हे दिव्यांग मदतीसाठी आले आहेत.
------------------------------------
रॅम्प, व्हीलचेअर, वॉकरची व्यवस्था
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्वसामान्यांबरोबरच दिव्यांग नागरिकही उत्साहाने मतदान करणार आहेत. दिव्यांगांच्या सोयीसाठी मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर, वॉकरची व्यवस्था करण्यात आली असून दिव्यांग व्यक्तीसुद्धा मतदान केंद्रावर मतदारांना मदत करणार आहेत.
----------------------------------------------------
निवडणूक आयोगाकडून दोन वेळा पीपीटीच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. सकाळी सातपासून कामाला सुरुवात होणार असून या कामात कोणतीही कुचराई केली जाणार नाही, याची काळजी घेऊ.
- विठ्ठल साबळे, निवडणूक केंद्रावरील अधिकारी
-----------------------------------------
दिव्यांग असलो तरी काम करण्यास घाबरत नाही, मात्र पहिल्यांदाच निवडणुकीचे काम करणार असल्याने थोडेसे दडपण आले आहे.
- अमित पाटील, निवडणूक केंद्रावरील अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.