मनसेचा मुंबईतून सुपडा साफ
बाळा नांदगावकर वगळता सर्व तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरली होती. मुंबईत मनसेने २५ उमेदवार दिले होते, मात्र मनसेचा सुपडा साफ झाला असून बाळा नांदगावकर वगळता इतर ठिकाणी मनसेचे सर्व उमेदवार तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.
मुंबईतील २५ उमेदवारांपैकी माहीम अमित ठाकरे, वरळी संदीप देशपांडे, शिवडी बाळा नांदगावकर, भांडुप पश्चिम शिरीष सावंत, वांद्रे पूर्व तृप्ती सावंत हे जोरात लढत देतील, अशी अपेक्षा होती. त्यांच्यासाठी राज ठाकरे मुंबईत ठाण मांडून होते. अनेक सभाही त्यांनी घेतल्या, मात्र त्याला फारसे यश आले नाही.
शिवडीमध्ये बाळा नांदगावकर यांनी चांगली मते मिळवत ठाकरे गटाच्या अजय चौधरी यांना जोरदार टक्कर दिली. याच मतदारसंघात मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवता आली. बाळा नांदगावकर यांना ६७ हजार ७५० मते मिळाली. त्यांचा सात हजार १४० मतांनी पराभव झाला. बाकी सर्व जागांवर मनसेचे पानिपत झाले, तर दुसरीकडे माहीम, वरळी, भांडुप पश्चिम या ठिकाणी जिंकलेल्या उमेदवारांना मदत झाली.
वरळीत संदीप देशपांडे यांना १९ हजार ३६७, माहीम येथे अमित ठाकरे यांना ३३ हजार ०६२, भांडुप २३ हजार ३३५ आणि वांद्रे पूर्वेत १६ हजार ०७४ मते मिळाली. बाकी ठिकाणी मनसेचे उमेदवार तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. बऱ्याच ठिकाणी तर एक, दोन हजार मतांवर समाधान मानावे लागले, मात्र मुंबईतील अटीतटीच्या लढतींमध्ये मनसेमुळे महाविकास आघाडीच्या जागांना फटका बसला.
महाविकास आघाडीला फटका
मनसेने बहुतांश उमेदवार महविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात उभे केले होते. येथील उमेदवारांना पाच ते २८ हजारांपर्यंत मते मिळाली. त्यामुळे बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार ५०० ते हजार मतांनी पराभूत झाले आहेत. मनसेच्या उमेदवारांचा फटका बसल्याने महाविकास आघाडीला मोठा फटका बसला.
मिळालेली मते
मानखुर्द, जगदीश खांडेकर-५,४१४
चांदिवली, महेंद्र भानुशाली - ७,३४७
चेंबूर, माऊली थोरवे - ७,८२०
घाटकोपर पू, संदीप कुलथे - ५,६१५
घाटकोपर प., गणेश चुक्कल - २५,८६२
विक्रोळी, विश्वजित ढोलम - १६,८१३
गोरेगाव, वीरेंद्र जाधव - ९,७१८
कांदिवली पू., महेश फरकासे - ७,८७६
वर्सोवा, राजू पेडणेकर - ६,७५२
दिंडोशी, भास्कर परब - २०,३०९
दहिसर, राजेश येऊनकर - ५,४५६
बोरिवली, कुणाल माईनकर - १७,८२९
मागाठाणे, नयन कदम - २१,२९७
अणुशक्तीनगर, नवीन आचार्य - २८३६२
कुर्ला, प्रदीप वाघमारे - ३,१९७
वडाळा, स्नेहल जाधव - ६,९७२
चारकोप, दिनेश साळवी - १५,२००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.