पर्यावरण बदलांचा लहान मुलांवर गंभीर परिणाम
‘युनिसेफ’च्या अहवालाचे राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई, ता. ३ : भारतात लहान मुलांची संख्या २०५० पर्यंत जगात सर्वाधिक, म्हणजे अंदाजे ३५ कोटी असेल. महाराष्ट्रासह आसाम, ओडिशा, पश्चिम बंगाल व इतर काही राज्यांना पर्यावरणविषयक अनेक गंभीर संकटांना सामोरे जावे लागेल, पर्यावरण बदल, तसेच जैवविविधता व नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासाची झळ विशेषतः लहान मुलांना बसेल, असे ‘युनिसेफ’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या दृष्टीने राज्याने आरोग्य सेवा, शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण, नोकरीच्या समन्यायी संधी निर्माण करणे व तंत्रज्ञान उपलब्धतेतील तफावत कमी करणे आदी क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी येथे केले.
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते युनिसेफच्या ‘स्टेट ऑफ द वर्ल्डस चिल्ड्रन रिपोर्ट २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्य’ या विषयावरील अहवालाचे प्रकाशन राजभवन येथे सोमवारी (ता. २) करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. पर्यावरण बदलांना तोंड देताना युवा पर्यावरण योद्धे व समाजातील विविध घटकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे सांगून राज्यपालांनी महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ॲक्शन आणि ग्रीन क्लब या पर्यावरण उपक्रमांना, तसेच पर्यावरण योद्ध्यांना त्यांच्या कामाबद्दल कौतुकाची थाप दिली. पर्यावरणविषयक अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये सुरू करण्याबाबत आपण सकारात्मक विचार करू, असे राज्यपालांनी या वेळी सांगितले. या वेळी बोलताना युनिसेफ महाराष्ट्रचे मुख्य अधिकारी संजय सिंह यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये पर्यावरणविषयक अभ्यासक्रम राबविण्याची राज्यपालांना विनंती केली. या वेळी महाविद्यालयीन पर्यावरण योद्धे गुरप्रीत कौर आणि पूजा विश्वकर्मा यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.
‘वातावरण बदलाची प्रखरता आठपट वाढणार’
सुमारे १० कोटी बालक सध्या अति जोखमीच्या पर्यावरणीय संकटग्रस्त देशात राहत आहेत. पर्यावरण बदलांवर वेळीच कारवाई केली नाही, तर ही संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. हवामान आणि पर्यावरण संकटाचा विशेषत: बालकांवर गंभीर परिणाम होतो. विशेषत: दुष्काळी भाग, समुद्रकिनारी, शहरी गरीब वस्त्यात, पाणथळ भागात राहणारे, यांच्यासाठी तीव्र उष्णतेच्या झळा, पूर, वणवे आणि चक्रीवादळ याची प्रखरता आठपट वाढतील, असा अंदाज युनिसेफच्या ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्टमध्ये वर्तविण्यात आला आहे. चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स (सीसीआरआय) नुसार २०२१ मध्ये जगातील १६३ देशांमध्ये अति उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ आणि वायुप्रदूषण यामुळे भारताचा क्रमांक २६ होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.