अपघातग्रस्त रस्त्याचे रुंदीकरण रखडले
अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी : पदपथांवर अतिक्रमण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : कुर्ला येथील ज्या एसजी बर्वे रस्त्यावर बेस्ट बसला अपघात झाला, त्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे नियोजन महापालिकेने ४० वर्षांपूर्वी केले होते; मात्र आजपर्यंत त्या प्रस्तावाची अंमलबजावणी झालेली नाही. सोमवारी झालेल्या बस अपघाताला महापालिका प्रशासनही जबाबदार असल्याची टीका होऊ लागली आहे.
पालिकेतील एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना म्हटले की, बीकेसी परिसराचा विस्तार करण्याचे नियोजन सुरू असताना साधारणत: चार दशकांपूर्वी एसजी बर्वे मार्ग (सीएसटी रोड) रुंदीकरणाची प्रस्तावित डी. पी. योजना तयार केली होती, मात्र त्यावर पुढे काहीही कारवाई झाली नाही. ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या यादव मंडईमार्गे जोडणाऱ्या छोट्या मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात येणार होता; मात्र या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने हा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे.
सद्यस्थितीत एसजी बर्वे मार्गावरील पदपथ गायब झाले आहेत. दुकानदारांनी हळूहळू दुकाने पुढे सरकवत थेट पदपथावरच कब्जा केला आहे. हा प्रकार महापालिका एल वॉर्ड मुख्यालयासमोर उघडपणे सुरू आहे. केवळ पदपथच नव्हे, तर फेरीवाल्यांनी हळूहळू रस्ताही ताब्यात घेतला आहे.
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान
महत्त्वाचे म्हणजे एल वॉर्डच्या हद्दीमध्ये हा प्रकार झाला त्यांनाही या अतिक्रमण किंवा येथील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करता आलेली नाही. शहरातील प्रत्येक रस्त्याला समांतर फूटपाथ असावेत, असे न्यायालयाने आदेश देऊनही त्यावर कारवाई मात्र झाली नाही. उलटपक्षी या आदेशाचा अवमान करण्यात आला आहे. पादचाऱ्यांसाठी येथे जर पदपथ असते, तर हे मृत्यू कमी झाले असते. अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहेत.
डीपी योजना न राबविल्याने एसजी बर्वे मार्गात अनेक अडथळे येत आहेत. सध्या ज्या ठिकाणी एसआरएअंतर्गत भूखंडांचा पुनर्विकास झाला आहे, त्या ठिकाणीच रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. अजूनही रस्त्याच्या कडेला अनेक झोपडपट्ट्या दाटीवाटीने आहेत. त्यामुळे गर्दीही वाढली आहे. अशाच ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे.
-जितेंद्र गुप्ता, संस्थापक सदस्य, नागरिक परिवहन समिती (सीटीएस)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.