मुंबईत प्रतिकिमी १,३५५ दुचाकी
परिवहन विभागाची माहिती; ताडदेव आरटीओत आठ लाखांवर नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : शहरात दुचाकींची संख्या २७ लाखांवर गेली असून, प्रति किमी एक हजार ३५५ दुचाकींचे प्रमाण असल्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी आज (ता. १८) दिली. दुसऱ्या क्रमांकाची घनता असलेले शहर पुणे असून, प्रति किमी १,११२ दुचाकींची घनता आहे. पुण्यात २४ लाख ५० लाखांहून अधिक दुचाकी आहेत. चेन्नई, बंगळूर, दिल्ली आणि कोलकाता येथे प्रति किमी १००० पेक्षा कमी दुचाकी आहेत.
सात वर्षांत मुंबईत दुचाकींची संख्या वाढली आहे. २०१७ मध्ये १९ लाखांवरून ही संख्या २७ लाखांवर गेली आहे, असे सूत्रांनी सांगितले. दसरा आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात दुचाकींची मोठ्या प्रमाणावर विक्री होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत दुचाकींची संख्या वाढल्यामुळे प्रदूषणात भर पडली आहे, तसेच पार्किंगचीही समस्या निर्माण झाली आहे. वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दुचाकी आता रस्त्यावर अधिक जागा व्यापतात आणि कधी कधी अगदी जवळून किंवा फूटपाथवर चालवतात, ज्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होते.
मुंबई मोबिलिटी फोरमचे ए. व्ही. शेणॉय म्हणाले की, ‘लवकरच अशी वेळ येईल जेव्हा नागरिक नवीन दुचाकी खरेदी करण्यापासून स्वतःला प्रतिबंधित करतील. दुचाकी बेस्ट एसी बससारख्या परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीपेक्षा अधिक किफायतशीर नाही. एसी बसमधून तुम्हाला सहा रुपयांत पाच किमीचा प्रवास करता येतो. बेस्टने बसचा ताफा वाढवल्यास लोक बसकडे वळतील. मुंबईत रस्त्यांची मर्यादित जागा पाहता शहरातील दुचाकींच्या नोंदणीवर ‘सीलिंग’ लावण्यात आले पाहिजे. वर्षभरात किती नवीन दुचाकींची नोंदणी करता येईल, याची मर्यादा असावी, अशी मागणी परिवहन कार्यकर्ते गौरांग व्होरा यांनी केली.
===
मुंबईतील वाहनसंख्या
आरटीओ - वाहनसंख्या
ताडदेव - १४,२३,१८८
अंधेरी - ८,४५,५५८
वडाळा - १२,३५,०७९
बोरिवली - ९,६७,९३७
एकूण - ४४,७३,७६२
===========
वाहन प्रकार- संख्या
दुचाकी - २७,०९,४२१
तीनचाकी - २,०९,४३७
चारचाकी - १२,२९,२६३
===
विकसित देशांत वाहनसंख्या कमी करण्यासाठी विविध नियम आहेत. सिंगापूर येथे वाहतूक कोंडी शुल्क आकारण्यात येते, तर लंडनमध्ये पार्किंग शुल्क जास्त आहे. त्यामुळे लोकांना वाहन खरेदी करताना विचार करावा लागतो. चीनमध्ये वाहनविक्री मर्यादा लावण्यात आली आहे. जपानमध्ये पार्किंगसाठी जागा असेल, तरच वाहन घेता येते. इतर देशांच्या तुलनेत जपानी पॅटर्न आपल्याकडे आणण्याबाबत विचार सुरू आहे.
- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.