दहावीच्या परीक्षेसाठी शाळांची तयारी पूर्ण
मुंबई विभागातून ३.६० लाख विद्यार्थी देणार परीक्षा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून (ता. २१) सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या २३ हजारांहून अधिक शाळांनी जय्यत तयारी केली आहे. दहावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि आनंददायी वातावरणात व्हावी, यासाठी विविध संघटनांनीही पुढाकार घेतला असून, राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी केलेल्या नियोजनासाठी त्यांची मदत होणार आहे.
राज्यभरातून दहावीच्या परीक्षेला एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसणार असून, यामध्ये मुंबई विभागातून तीन लाख ६० हजार ३१७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्याखालोखाल पुणे विभागातून दोन लाख ७५ हजार ४ विद्यार्थी तीन हजार ६३४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत, तर सर्वात कमी कोकण विभागात २७ हजार विद्यार्थीसंख्या आहे. मुंबई विभागात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. यामुळे परीक्षा केंद्रे आणि शाळांची संख्यादेखील राज्यातील इतर मंडळाच्या तुलनेत अधिक आहे. त्यापैकी सर्वाधिक केंद्रे ठाणे जिल्ह्यात आहेत.
--
अडीच हजार दिव्यांग विद्यार्थी
राज्यातील दोन हजार ४६० दिव्यांग विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. त्यापैकी मुंबई विभागात दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या एक हजार ४०४ असून, सर्वात कमी ३७ दिव्यांग विद्यार्थी लातूर विभागात आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर तसेच परीक्षेवेळी अडचणींचा सामना करावा लागू नये, म्हणून मंडळाकडून विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
--
मुंबईतील विद्यार्थीसंख्या आणि परीक्षा केंद्रे
एकूण विद्यार्थी : ३,६०,३१७
नियमित विद्यार्थी : ३,३७,६१६
खासगी विद्यार्थी : १५,९३१
रिपीटर विद्यार्थी : २,४२०
दिव्यांग विद्यार्थी : १,४०४
परीक्षा केंद्रे : १,०५५
एकूण शाळा : ४,००५
------
दहावीची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याला आनंददायी वातावरणात देता यावी, यासाठी मंडळाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी विविध प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे.
- शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ
--
दहावीच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षा सुरळीत पद्धतीने पार पडण्यासाठी मंडळाला सर्व प्रकारचे सहकार्य केले जाणार आहे.
- डॉ. संजयराव तायडे-पाटील, अध्यक्ष, मेस्टा
----
विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकाराचा अवलंब न करता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. त्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे.
- महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.