आयआयटीच्या धर्तीवर
मुंबईत ‘आयआयसीटी’
मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; फिल्म सिटीत जागा देणार, केंद्राकडून ४०० कोटी
नवी दिल्ली, ता. १४ : देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईतील गोरेगाव येथे उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकार ४०० कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल ॲण्ड एंटरटेनमेंट समिट २०२५ - वेव्ह्ज २०२५)च्या पहिल्या सत्राचे आयोजन गुरुवारी (ता. १३) सुषमा स्वराज भवन येथे करण्यात आले. या सत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. जागतिक स्तरावर होणाऱ्या पहिल्या वेव्ह्ज परिषदेचे यजमानपद महाराष्ट्राला मिळाले आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले. या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आदी मान्यवर उपस्थित होते. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी प्रास्ताविक केले, तर आभार राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी व्यक्त केले. या वेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.
----
मुंबई हे बॉलीवूड आणि मनोरंजन उद्योगाचे मोठे केंद्र आहे. ‘आयआयसीटी’ या नव्या संस्थेमुळे भारताच्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळणार आहे. दावोसप्रमाणे हे व्यासपीठ क्रिएटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जागतिक ब्रँड ठरून मुंबई हे क्रिएटिव्ह हब बनेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
---
महाराष्ट्रात १ मेपासून पहिली वेव्ह्ज परिषद
मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे १ ते ४ मे २०२५ दरम्यान पहिली वेव्ह्ज परिषद होणार आहे. शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राचे आयोजन गुरुवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने केले होते. या सत्रात विविध देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांनी सहभाग घेतला होता. या वेळी माहिती व प्रसारण मंत्रालय व महाराष्ट्र सरकार यांच्यादरम्यान ‘वेव्ह्ज २०२५’निमित्त सामंजस्य करार झाला. या परिषदेत १०० देश सहभागी होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.