गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला पसंती
मुंबईत आठ दिवसांत ५,८३१ वाहनांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत वाहन खरेदीला चांगली पसंती मिळाली. ताडदेव, बोरिवली आणि अंधेरी या तीन आरटीओंमध्ये २३ ते ३० मार्चदरम्यान नव्या पाच हजार ८३१ वाहनांची नोंद झाली. गेल्या वर्षी मुंबईत पाच हजार २४६ नवीन वाहने दाखल झाली होती. राज्यात तब्बल ८७ हजार ४९६ नव्या वाहनांची भर पडली असून यात दुचाकींची संख्या ५१ हजार ७५६ आहे.
या मुहूर्तावर नवीन गोष्टींची खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी गाडी, घर आणि सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होते. गुढीपाडव्याला दारात नवीन गाडी आणण्यावर नागरिकांचा मोठा भर असतो. या मुहूर्तावरच गाडी मिळावी, यासाठी नागरिक वाहन विक्रेत्यांकडे तगादा लावतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून पाडव्याच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी एक-दोन दिवस आधी गाडी दारात आणण्यात येते. मुंबई शहरात मुंबई सेंट्रल (ताडदेव), अंधेरी, वडाळा आणि बोरिवली असे चार आरटीओ आहेत. बोरिवली आरटीओमध्ये दोन हजार ६७९, अंधेरी आरटीओत एक हजार ८४२ वाहनांची नोंद झाली आहे. वडाळा आरटीओमध्ये एक हजार ९४५ वाहने रजिस्टर झाली. त्यात एक हजार ३४६ दुचाकी, तर ५९९ चारचाकी आहेत. मुंबईत नव्याने तीन हजार ९५९ दुचाकी दाखल झाल्या आहेत. ताडदेव आरटीओची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही.
...
गुढीपाडवा वाहन खरेदी (२३ ते ३० मार्च)
आरटीओ - चारचाकी - दुचाकी
वडाळा - ५९९ - १,३४६
अंधेरी - ६०७ - ९४६
बोरिवली - ६६६ - १,६६७
एकूण - १,८७२ - ३,९५९
...
मागील वर्षातील आकडेवारी (४ ते ९ एप्रिल २०२४)
आरटीओ - चारचाकी - दुचाकी
ताडदेव - ५३६ - ७५०
वडाळा - ४३८ - १,०२९
अंधेरी - ४१० - ६९७
बोरिवली - ४२४ - ९६२
एकूण - १,८०८ - ३,४३८
...
दुचाकींना जास्त मागणी
मुंबईत सुरू असलेली विविध विकासकामे, रस्त्यांची स्थिती, वाहतूक कोंडी, पार्किंगची बोंब यामुळे मुंबईकरांनी चारचाकीपेक्षा दुचाकीला जास्त पसंती दिली आहे. दुचाकी खरेदीकरिता कमी डाउनपेमेंट, कमी वेळात कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे नागरिक दुचाकी खरेदीला प्राधान्य देतात. सहा दिवसांत तीन हजार ४३८ दुचाकींची भर पडली.
...
राज्यातील आकडेवारी (२४ ते ३० मार्च)
वर्ष - चारचाकी - दुचाकी - एकूण
२०२४ - १७,१३९ - ४०,६७५ - ६६,७५७
२०२५ - २२,३२७ - ५२,१५३ - ८७,४९६
...
राज्यातील पाच प्रमुख आरटीओतील नोंदणी
पुणे - ११,०५६
पिंपरी-चिंचवड - ६,६४८
नाशिक - ३,६२६
ताडदेव (मुंबई) - ३,१५४
ठाणे - ३,१०७
...
घरखरेदीला थंड प्रतिसाद!
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत अनेक जण नवे घर घेतात; पण आज मुंबईसह एमएमआर क्षेत्रात घरखरेदीला थंड प्रतिसाद मिळाला आहे. नवीन घराचे बुकिंग असो की घराची नोंदणी असो मागील वर्षीच्या तुलनेत अल्प प्रमाणात झाली आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षी घर खरेदीदारांप्रमाणेच विकसकही नवीन प्रकल्प सुरू करतात; मात्र सध्या बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे घरांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे यंदा विकसकांनी नवीन प्रकल्प सुरू करताना सावध भूमिका घेतली आहे. आज एमएमआरमध्ये केवळ ५०-६० नवीन गृहप्रकल्प सुरू झाले असून मागील वर्षीच्या तुलनेत निम्मे असल्याचे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आनंद गुप्ता यांनी सांगितले. हीच परिस्थिती घर खरेदीदारांची असल्याचे सांगितले. सध्या रियल इस्टेट क्षेत्रात काहीशी मरगळ असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आज मुहूर्त असूनही घरखरेदीला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे विश्वस्त आनंद गुप्ता यांनी स्पष्ट केले. आज गुढीपाडव्याचा मुहूर्त असतानाही मुंबईत केवळ ४८० घरांचे ऑनलाइन अभिहस्तांतरण झाले आहे. यावरून मुंबईकरांकडून घरखरेदीला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.