गृहप्रकल्पाची माहिती ठळक छापणे बंधनकारक
महारेरा नोंदणीक्रमांक, क्यूआर कोड हवा; उल्लंघन केल्यास ५० हजार दंड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने विकसकांकडून केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींमध्ये प्रकल्पाचा महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा संकेतस्थळाचा तपशील आणि क्यूआर कोड ठळकपणे छापणे महारेराने बंधनकारक केले आहे. या जाहिरातींमध्ये ज्या फॉन्टमध्ये प्रकल्पाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक छापला आहे, त्याच फाॅन्टमध्ये नोंदणी क्रमांक, क्यूआर कोड आदी माहिती छापली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे घरखरेदीदारांना प्रकल्पाबाबतची माहिती सहजपणे मिळू शकणार आहे.
विकसक गृहनिर्माण प्रकल्पांची जाहिरातबाजी करताना महारेरा नोंदणी क्रमांक आणि प्रकल्पाची माहिती सांगणारा क्यूआर कोड दिसणार नाही अशा पद्धतीने एका कोपऱ्यात छापतात. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना प्रकल्पाबाबतची माहिती मिळवणे कठीण होते. ही गैरसोय टाळण्याबरोबरच ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी जाहिरातीत नोंदणी क्रमांक, क्यूआर कोड आदी बाबी ठळकपणे छापण्याबाबत परिपत्रक काढले आहे. याची अंमलबजावणी न करणाऱ्या विकसकांना ५० हजारांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. त्यानंतर १० दिवसांत चुकीची दुरूस्ती करून महारेरा नोंदणी क्रमांक, संकेतस्थळाचा तपशील आणि क्यूआर कोड विहित आकारात ठळकपणे छापला नाही, तर ‘निर्देशांचा सततचा भंग’ गृहीत धरून नियमानुसार कडक कारवाई केली जाणार आहे.
महारेराने बंधनकारक केलेला हा सर्व तपशील जाहिरातीच्या वरील भागात उजवीकडे रंगीत मजकुरात छापणे अत्यावश्यक आहे. याबाबतचे निर्देश महारेराने एक परिपत्रक काढून नुकतेच जारी केले आहेत. हे निर्देश तातडीने लागू करण्यात आले आहेत.
क्यूआर कोड स्कॅन न झाल्यास दंड
महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा संकेतस्थळ, क्यूआर कोड ठळकपणे छापणे यापूर्वीच अत्यावश्यक करण्यात आले आहे, परंतु अनेकदा हे क्यूआर कोड स्कॅनच होत नाहीत. त्यामुळे त्याचा हेतू साध्य होत नाही. आता क्यूआर कोड स्कॅन न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.