विनंती बदल्यांसाठी ‘परिवहन’मध्ये लॉबिंग
ओएसडी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये भेटीगाठी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे उघड झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र आता विनंती बदल्यांच्या नावाखाली मोटार वाहन निरीक्षकांना मर्जीतील पोस्टिंग मिळणार आहे. त्यामुळे परिवहनमंत्री कार्यालयातील एक ओएसडी आणि परिवहन कार्यालयातील एका उच्चपदस्थ अधिकारी या ‘केके’ जोडगोळीकडून लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षकांना मर्जीतील पोस्टिंग मिळवून देण्याचे आश्वासन या दोन अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यातील ३५ अधिकाऱ्यांची फाइल तयार करण्यात आली आहे. परिवहन विभागातील ८० ते १०० अधिकाऱ्यांची बदली करण्याचे नियोजन आहे. तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना पदोन्नती मिळणार आहे. त्यातील ३० जणांची यादी तयार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण असल्याची चर्चा परिवहन विभागात सुरू आहे. या बदल्या आणि पदोन्नतीला कोणी अडसर ठरू नये, म्हणून एका मर्जीतील अधिकाऱ्याला मंत्रालयात मोठ्या पदावर बसविण्यासाठी परिवहनमंत्री कार्यालयातील ओएसडीकडून प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याची ओएसडीकडून सातत्याने भेटीगाठी सुरू आहेत. या ‘केके’ जोडगोळीला सहकार्य न करणाऱ्या परिवहन विभागातील अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यामध्ये काही अधिकाऱ्यांना अकार्यकारी करण्यात आले आहे, तर काही अधिकाऱ्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
====
विनंती बदल्यांचे अधिकार मंत्र्याकडे असतात. विनंती योग्य असल्यास, पुढील कार्यवाही केली जाते. या प्रक्रियेत कोणी गैरप्रकार करत असेल, तर त्याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.