एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होईल!
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : ‘एसटी कर्मचाऱ्यांचा पगार यापुढे दर महिन्याच्या ७ तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल, असे आश्वासन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी (ता. ११) सर्व कर्मचाऱ्यांना दिले. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. या वेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य व परिवहन आयुक्त विवेक भीमनराव एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
सरनाईक म्हणाले की, ‘आर्थिक अडचणीमुळे एसटीत काम करणाऱ्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना मार्चचे वेतन केवळ ५६ टक्के देता आले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढे या कर्मचाऱ्याचा पगार दरमहा ७ तारखेला त्यांच्या बॅंक खात्यांत जमा करण्यात येईल. त्यासाठी राजशिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती करेन, परंतु आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही, याची जबाबदारी मी घेईन.’ यापुढे एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच परिवहन सेवा प्रवासीभिमुख व दर्जेदार करण्यासाठी काही चांगले निर्णयदेखील आम्ही घेणार असल्याचेही सरनाईक यांनी या वेळी सांगितले. ‘खासगी विकसकांच्या माध्यमातून बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर राज्यातील एसटी आगाराचा विकास केला जाणार असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ६६ जागांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.’ अशी माहिती ही सरनाईक यांनी दिली.
===
२५ हजार बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार
एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या सर्व जुन्या बस स्क्रॅप करण्यात येत असून, त्या ठिकाणी नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यंदा २,६४० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असून, त्यापैकी ११३ आगारात ८०० पेक्षा जास्त नवीन बस प्रवासी सेवेत रुजू झालेल्या आहेत. सध्या तीन हजार नवीन बसेसची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण व दुर्गम भागात उपयुक्त ठरेल, अशा मिडी बस घेण्यात येणार आहेत. तसेच शहरी भागातील उन्नत स्तरातील प्रवाशांसाठी २०० अत्याधुनिक, वातानुकूलित शयनयान बस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी घेतल्या जातील, अशी माहितीही सरनाईक यांनी या वेळी सांगितली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.