‘भारत गौरव सर्किट यात्रे’तून शिवप्रेमींना गडकोटांचा ऐतिहासिक प्रवास
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांना रेल्वेमार्गे भेट देण्याची ऐतिहासिक संधी आता पर्यटकांना मिळणार आहे. मुंबईत शुक्रवारी (ता. ११) झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भारत गौरव सर्किट यात्रा’अंतर्गत छत्रपती शिवरायांशी संबंधित स्थळांना भेट देणाऱ्या विशेष १० दिवसांच्या ऐतिहासिक टूरची घोषणा केली आहे.
भारत गौरव सर्किट यात्रेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शिवकालीन किल्ले, राजवाडे आणि ऐतिहासिक युद्धभूमी यांचा समावेश असून, केंद्र सरकारच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांअंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे. ‘ही यात्रा म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, तर देशभक्तीचा अनुभव आहे. शिवरायांच्या चरित्राशी नव्या पिढीला जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले. या विशेष भारत गौरव टूरिस्ट ट्रेनमध्ये पर्यटकांसाठी निवास, नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण, स्थानिक वाहतूक आणि अनुभवी मार्गदर्शक अशा सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. ही यात्रा आयआरसीटीसीमार्फत राबवली जाणार आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी महाराष्ट्रासाठी मंजूर झालेल्या विविध रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. गोंदिया-बल्लारशहा मार्गावरील २४० किमी लांबीच्या दुहेरीकरण प्रकल्पाला ४,८१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रेल्वे वाहतूक क्षमता वाढून पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळणार आहे.
रेल्वेच्या प्रकल्पामुळे छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश यांच्यासह महाराष्ट्रातील व्यापारी संधी वाढतील. सध्या राज्यातील १३२ स्थानकांचा पुनर्विकास सुरू आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पांसाठी राज्याला २३,७०० कोटी रुपयांचा भरीव निधी मिळाला आहे. त्यातच आता रेल्वे मंत्रालय आणि पर्यटन विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर लवकरच सुरू होईल. ही यात्रा तरुण पिढीला आपल्या इतिहासाशी जोडणारी आणि प्रेरणा देणारी ठरेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प
गोंदिया-बल्लारशाह दुहेरीकरण प्रकल्प
२४० किमी लांबी, खर्च ४,८१९ कोटी
विदर्भ, मराठवाडा, आंध्र प्रदेश व छत्तीसगड यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग
इतर महत्त्वाचे प्रकल्प निधी
अजिंठा- जळगाव- जालना नवीन मार्ग ७,१०६ कोटी
मनमाड-इंदूर नवीन मार्ग १८,००० कोटी
मनमाड-जळगाव चौथा मार्ग २,७०० कोटी
भुसावळ-खंडवा तिसरी व चौथी लाइन ३,५०० कोटी
अमृत भारत स्टेशन योजना
१३२ स्थानकांचे पुनर्विकासाचे काम सुरू
भारतातील १,३०० स्थानकांमध्ये समावेश
महाराष्ट्रात १,७३,८०४ कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे काम सुरू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.