मुंबईत अफवांचे वादळ तीव्र
युद्धजन्य परिस्थितीत उलटसुलट चर्चांना उधाण; अनेक कुटुंबे निघाली गावाला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः पहलगाम हल्ल्यानंतर उठलेल्या अफवांचे वादळ ऑपरेशन सिंदूरमुळे अधिक तीव्र झाले. या अफवांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील घराघरात भीतीचे वातावरण असून, सुट्टीच्या हंगामात नियोजन नसताना अनेक कुटुंबे आपापल्या गावी निघाल्याचे चित्र आहे.
सर्वाधिक अफवा समाजमाध्यमांवरून पसरवल्या जात आहेत. त्यात युद्ध, प्रतिहल्ला, दहशतवादी कृती, उभय देशांची सैन्य सज्जता, सीमेपलीकडे, सीमेवर घडणाऱ्या घडामोडी याबाबत बिनबुडाची चर्चा, अर्धसत्य, खोटी माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधील संभ्रम, भीती वाढवत आहेत.
पहलगाम हल्ला घडताच केंद्र सरकारने कठोर भूमिका घेत पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी व्यूहरचना आखली. लगोलग देशात सर्वत्र लष्करी हालचाली, सज्जता तपासणी, सतर्क राहण्याच्या सूचना, पोलिसांकडून संचलन, बंदोबस्त, माँक ड्रिल आदी घडामोडी वेगाने घडल्या. त्यामुळे भारत-पाक युद्ध अटळ, अशीच चर्चा सर्वत्र सुरू आणि मनामनात भीती घर करू लागली.
भारतीय लष्कराने त्यातच अनपेक्षितरित्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर उभय देशांचे आरोप-प्रत्यारोप, वल्गनांमुळे पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांकडून प्रतिहल्ल्याच्या शक्यतेने नागरिकांमधील चिंता, भीती आणखी वाढली.
या परिस्थितीत समाजमाध्यमांवरून विशेषतः व्हॉट्सॲप, एक्स आणि इन्स्टाग्रामवरील संभ्रम निर्माण करणारी अधिकृत, अर्धसत्य, खोटी माहिती खतपाणी घालते आहे. व्हॉट्सॲपवरून सध्या वैधानिक असे शीर्षक देत त्या खाली पुढील दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य, औषधसाठा, पर्यायी विद्युत योजना, पाणीसाठा, वाहनांमधील इंधनसाठा तयार ठेवा, असे आवाहन करण्यात आले. अन्य एका संदेशात आवश्यक त्या कपडे आणि गरजेच्या वस्तू असलेली बॅग सज्ज ठेवा, आपल्या कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकेल, असे सांगण्यात आले.
ऑपरेशन सिंदूरनंतर युद्ध झाल्यास भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याबाबत अनधिकृत माहिती समाजमाध्यमांवरून पसरली आहे. त्यांच्याकडे आपल्यापेक्षा अधिक क्षमतेची, अद्ययावत युद्ध सामग्री आहे, अशा आशयाचे संदेश वेगाने सर्वदूर पसरू पाहात आहेत. अगदी ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांनी आपली इतकी लढाऊ विमाने पाडली इथपासून उलट आपणच त्यांची तितकी विमाने उडवली, अशा घटनाआधारित संभ्रमित करणारे तपशील पसरल्याने भीतीचा माहोल आहे.
खातरजमेसाठी १०० नंबर अविश्रांत
गेल्या काही दिवसांत समाजमाध्यमांवरून पसरणाऱ्या उलटसुलट माहितीमुळे संभ्रमित झालेल्या ठरावीक सुजान नागरिकांनी थेट पोलिसांच्या १०० या विश्वसनीय हेल्पलाइनवर संपर्क साधून युद्ध होणार का इथपासून प्राप्त अमुक तमुक माहिती खरी आहे का, असे विचारण्यास सुरुवात केली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
मुंबई पोलिस दलाने अफवा पसरवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे.
व्हॉट्सॲपसह अन्य समाजमाध्यमांवर येणारी प्रत्येक माहिती किंवा साहित्यात तथ्य असतेच असे नाही. अनेकदा ते वैयक्तिक मत किंवा निरीक्षण असू शकते. अशा परिस्थितीत राज्य शासन, शासकीय विभाग, जिल्हाधिकारी, पोलिस, महापालिका आदी यंत्रणांकडून परिस्थितीनुसार अधिकृत सूचना जारी केल्या जातात. त्यावरच नागरिकांनी विश्वास ठेवावा. संभ्रमित करणारी माहिती प्राप्त झाल्यास ती पुढे पाठवण्याऐवजी आधी त्यातील तथ्य तपासून घ्यावे.
- दत्ता नलावडे, पोलिस उपआयुक्त
मुंबई पोलिस दलाचे जनसंपर्क अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.