वांद्रे ते अंधेरी रिक्षाभाडे ९० हजार
तरुणाला फसवणाऱ्या रिक्षाचालकाचा शोध सुरू
मुंबई, ता. २३ : पंजाबहून रोजगारासाठी मुंबईत आलेल्या एका तरुणाला वांद्रे ते अंधेरी हा रिक्षा प्रवास तब्बल ९० हजार रुपयांना पडला. अमूल्य शर्मा (वय ३०) असे या तरुणाचे नाव आहे. अमूल्यकडून ९० हजार रुपये उकळणाऱ्या रिक्षाचालकाचा शोध सध्या वांद्रे पोलिसांकडून सुरू आहे.
मूळचा चंडीगडचा रहिवासी अमूल्य मुंबईत एका खासगी कंपनीत काम करतो. ९ एप्रिलला रात्री वांद्रे येथे एका मित्रांनी आयोजित केलेल्या पार्टीला अमूल्यने हजेरी लावली. १० एप्रिलच्या पहाटे ५च्या सुमारास तो अंधेरी येथील घरी जाण्यासाठी रिक्षाने निघाला. रिक्षा भलत्याच रस्त्याने नेत असल्याचे लक्षात येताच अमूल्यने चालकाला जाब विचारला. त्यावरून चालक वाद घालू लागला. मुंबईत नवखा असल्याने आणि पहाटेची वेळ असल्याने अमूल्य घाबरला. साधारण पाऊण तासाने तो घराजवळ पोहोचला. रिक्षातून उतरताच अमूल्यने चालकाच्या हाती पाचशे रुपयांची नोट दिली. ती परत देत चालकाने दीड हजार रुपये मागितले. त्यावरून चालक पुन्हा वाद घालू लागला. अमूल्य पार्टीत आपला चष्मा विसरला होता. चष्मा लावल्याशिवाय त्याला अंधुक दिसते, शिवाय दीड हजार रुपये नव्हते. ही पंचाईत त्याने चालकाला सांगितली; मात्र तो दीड हजार रुपयांवर अडून होता. अखेर अमूल्यने आपला मोबाईल चालकाच्या हाती देत ऑनलाइन ॲपद्वारे व्यवहार करण्यास सांगितले. तेव्हा चालकाने दीड हजार रुपयांऐवजी तब्बल ९० हजार आपल्या खात्यावर घेतले.
...
वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार
आपली फसवणूक झाल्याची बाब दुसऱ्या दिवशी अमूल्यच्या लक्षात आली. दरम्यान, महत्त्वाच्या कामासाठी त्याला चंडीगडला जावे लागल्याने तेथून परतल्यावर त्याने वांद्रे पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. या व्यवहाराच्या तपशिलांवरून रिक्षाचालकाचे नाव फुरकान शेख असे असल्याचे पोलिसांना समजले. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.