संजय गांधी नॅशनल पार्कचा प्रवास होणार सुकर
चार वर्षांनंतर विस्टाडोमसह वनराणी धावणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील प्रतिष्ठित वनराणी टॉय ट्रेन यावर्षी जूनपासून पुन्हा पर्यटकांसाठी खुली केली जाणार आहे. त्यामुळे यंदा संजय गांधी नॅशनल पार्कचा प्रवास सुकर होणार आहे.
१०३ किलोमीटर परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे हजेरी लावतात. वनराणी ही ट्रेन कृष्णगिरी उपवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ५.५ चौरस किमी क्षेत्रफळाच्या नॅरोगेज ट्रॅकवर धावते. पर्यटकांना स्थानिक जैवविविधतेचा अनुभव घेताना मिनी प्राणिसंग्रहालयातील प्राणी पाहण्याची संधी मिळते.
ही टॉय ट्रेन १९७० मध्ये सुरू झाली होती. सुरुवातीला ती डिझेल इंजिनवर २.७ किमीच्या अंतरावर धावत होती. दर ३० मिनिटांनी गाड्या चालवल्या जातात. त्यासाठी किमान २० प्रवाशांची आवश्यकता असते. २०२१ मध्ये चक्रीवादळात ट्रॅक खराब झाल्यानंतर ही सेवा बंद करण्यात आली होती.
अशी असेल पर्यकांची व्यवस्था
तब्बल चार वर्षांनंतर वनराणी टॉय ट्रेन पुन्हा नव्या रूपात जूनपासून सुरू होणार आहे. नवीन गाड्यांमध्ये प्रत्येकी चार बोगी असतील. यामध्ये दोन वेगवेगळे डबे असतील. एका डब्यात विस्टाडोम कोच, दुसऱ्या डब्यात खुली बसण्याची जागा असेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या छोट्या प्रवासादरम्यान जंगलातील निसर्गरम्य जैवविविधतेचा आनंद घेता यावा, यासाठी विस्टाडोम कोच निवडण्यात आले आहेत. डिझेलवर चालणाऱ्या जुन्या गाड्यांपेक्षा नवीन गाड्या ३० मिनिटांच्या वारंवारतेने विजेवर धावतील. रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसद्वारे सुरू असलेले बांधकाम आणि जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच वनराणीचे उद्घाटन होण्याची अपेक्षा आहे.
राष्ट्रीय उद्यानात काय पाहाल?
बौद्धकालीन गुंफा
या बौद्धकालीन कान्हेरी गुंफा सुमारे दोन हजार वर्षे जुन्या असल्याचे सांगितले जाते.
बटरफ्लाय गार्डन
बटरफ्लाय गार्डनमध्ये १७० प्रजातींची फुलपाखरे आढळतात. कॉमन क्रो, द कॉमन टायगर, ब्लू टायगर, ग्रे पॅन्झी, द कॉमन जॅझबेल, द डार्क ब्रॅण्डेड बुशब्राऊन, द कॉमन एमिग्रंट, द टेल्ड जे, द ग्रेट ऑरेंज टिप ही यातील काही सहजपणे दृष्टीस पडणारी फुलपाखरे आहेत.
सिंह आणि व्याघ्र सफारी
सामान्य पर्यटकांना वाघ, सिंह पाहता यावेत, यासाठी उद्यानामध्येही सिंह सफारी, व्याघ्र सफारीचे आयोजन करण्यात येते. हे प्राणी इतर वेळी पिंजऱ्यांमध्ये असतात. जंगलामध्ये त्यांच्यासाठी एनक्लोजर्स तयार केली आहेत. सफारीच्या वेळी एका बंदिस्त बसमधून पर्यटकांना या भागाची सैर घडवली जाते.
राष्ट्रीय उद्यानाचे महत्त्वाचे आकर्षण
- सिह, व्याघ्र सफारी
- बोटिंग
- टॅक्सी डर्मी सेंटर
- कॅट ओरिन्टेझम सेंटर
- सुगंधी गार्डन
पाच वर्षांनी टॉय ट्रेन पुन्हा रुळावर येणार आहे. नवीन ट्रेनचे डिझाइन हे अधिक आरामदायी आणि प्रशस्त असणार आहे. जेणेकरून आम्ही अधिक पर्यटकांना आकर्षित करू शकू,
अनिता पाटील, संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
अनेक वर्षांनंतर या टॉय ट्रेनची सफर करता येईल, या विचाराने मी उत्साहित आहे. टॉय ट्रेन सुरू झाल्याने राष्ट्रीय उद्यानात बच्चेकंपनी धमाल करेल.
लक्ष्मी बनसोडे, पर्यटक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.