मद्यपान करून वाहन चालवण्यात नागपाडा पुढे
गेल्या वर्षी एक हजार घटना, वाहतूक पोलिसांचा अहवाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : दारू किंवा अल्कोहल हे आरोग्यासाठी हानिकारक असून, दारूच्या सेवनाने इतरही अनेक मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. खासकरून दारूचे सेवन करून वाहन चालवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते, मात्र तरीही मुंबईत अनेक जण मद्यपान करून वाहने चालवीत आहेत. गेल्या वर्षी जानेवारी डिसेंबर २०२४ मध्ये नागपाड्यात सर्वाधिक मद्यपान करून वाहन चालवण्याच्या घटना घडल्याचे वाहतूक पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे.
वाहन चालविण्यासाठी मन एकाग्र ठेवणे आणि शरीरावर नियंत्रण असणे गरजेचे असते, मात्र दारूमुळे व्यक्तीचे शरीरावरील नियंत्रण कमी होते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो. दारूचे सेवन करून वाहन चालवणे हे केवळ चालकाच्या नव्हे तर इतरांच्यादेखील जीवावर बेतू शकते. यासाठीच भारतासह इतर अनेक देशांमध्ये दारू पिऊन वाहन चालवण्यास बंदी असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे कायदेशीर गुन्हा आहे. भारतातही ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह प्रकरणात कारवाई करण्यात येते. तसेच वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला कोठडीदेखील होऊ शकते. आजही भारतामध्ये काही अपघातांसाठी मद्यधुंद अवस्थेत ड्रायव्हिंग करणे हे एक कारण आहे.
दारूचे सेवन करून वाहन चालवण्यास प्रतिबंध आणण्यासाठी कठोर नियम आहेत, मात्र अनेकांना हे नियमच ठाऊक नसतात किंवा काही जण या नियमांकडे दुर्लक्ष करतात.
ड्रंक ॲण्ड ड्राइव्हचे नियम
पहिल्यांदा दारूचे सेवन करून वाहन चालवताना आढळल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड आणि सहा महिन्यांच्या कारावासाची तरतूद आहे, तर दुसऱ्यांदा दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास दंड आणि कारावासाच्या शिक्षेमध्ये वाढ होऊ शकते.
दुसऱ्यांदा ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह करताना आढळल्यास १५ हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. तसेच दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी कोठडी होऊ शकते. अशाप्रसंगी केवळ दंड भरून वाहनचालकाची सुटका होत नाही, तर वाहनचालकावर कायदेशीर गुन्हा दाखल होतो.
सर्वाधिक मद्यपान कारवाई असलेले विभाग
वाहतूक विभाग - घटना
नागपाडा -१,००१
सहार - ५३२
मुलुंड-५०७
साकीनाका -४६९
दहिसर -४५१
कमी मद्यपान कारवाई असलेले विभाग
कुलाबा - १८
वडाळा -२६
कुर्ला -२६
पायधुनी - ३९
माटुंगा -४३
मद्यपान करून वाहन चालवणे चुकीचे आहे. मद्यपान केल्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटू शकते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो. मद्यपान करून वाहन चालवणे हे केवळ चालकाच्या नव्हे तर इतरांच्यादेखील जीवावर बेतू शकते.
- अजय गोवले, वाहतूकतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.