प्रभागांच्या सीमांकनासाठी सर्व्हे सुरू
अंतिम मसुदा नगरविकास विभागाकडे पाठवणार; २२७ जागांसाठीच मतदान होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मंगळवारी (ता. १०) मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी अधिसूचना जारी केली. अधिसूचना प्रसिद्ध होताच, महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला. अधिसूचनेत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची सीमांकन, जागांसाठी सोडत काढणे आणि सूचना आणि हरकती मागवणे यांचा समावेश असेल. पालिकेने यासाठी प्रत्येक प्रभागाचा सर्व्हे सुरू केला आहे. हे पूर्ण केल्यानंतर अंतिम मसुदा नगरविकास विभागाकडे पाठवला जाईल. नगरविकास विभाग तो राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवेल, त्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील.
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ फेब्रुवारी २०२२ रोजी संपला. महापालिका निवडणुका २०२२ मध्ये अपेक्षित होत्या, परंतु जागांची संख्या २३६ पर्यंत वाढवण्याच्या आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित राहिले. त्यामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. ६ मे रोजी झालेल्या या खटल्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांच्या आरक्षणाच्या आधारे महानगरपालिका निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून निवडणुकांच्या घोषणेची वाट पाहिली जात होती.
गेल्या तीन वर्षांपासून महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत. अखेर कायदेशीर अडचणीत अडकलेल्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. नगरविकास विभागाच्या अधिसूचनेत, महापालिकेला प्रभागांची यादी तयार करणे, त्यावर जनतेकडून हरकती आणि सूचना घेणे, प्रभाग आरक्षण आणि सोडत काढणे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिने लागू शकतात.
नगरविकास विभागाच्या आदेशानुसार, महानगरपालिका प्रशासन आपला संपूर्ण कार्यक्रम तयार करेल आणि निवडणूक प्रक्रिया सुरू करेल. प्रभागांचे सीमांकन पूर्ण झाल्यानंतर, ते अंतिम मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवावे लागेल. त्यानंतर तारखा जाहीर केल्या जातील. मुंबईत पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही, असा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात.
प्रभाग २२७ कायम राहणार
पूर्वीच्या २२७ प्रभागामध्ये वाढ करत ठाकरे सरकारच्या कारकीर्दीत ही संख्या २३६ वर गेली होती, पण न्यायालयाने ही प्रभाग रचना रद्दबातल ठरवली. त्यानंतर आता राज्य सरकारने अधिसूचना काढून निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महापालिका कामाला लागली आहे. आता लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांचे सीमांकन, जागांसाठी सोडत काढणे, सूचना आणि हरकती मागवणे यांचा समावेश असला तरी प्रभागांची संख्या ही २२७ इतकीच राहणार असून, त्यानुसारच कार्यक्रम आखला जाणार आहे.
महापालिका प्रशासन सज्ज
गेल्या तीन वर्षांत अनेकदा निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाल्याने पालिकेने तयारी केली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज आहे. प्रभाग ही २२७ राहणार असल्याने प्रभाग रचनेत ही फारसा बदल होणार नाही. केवळ प्रत्येक प्रभागातील मतदारांची संख्या ही समप्रमाणात राहावी, यासाठी नियोजन केले जाणार आहे. त्यानुसार सर्व प्रभागांची सीमांकने केली जातील आणि जागा राखीव ठेवल्या जातील. पालिकेने यासाठी सर्व्हेदेखील सुरू केला आहे.
सरकारच्या अधिसूचनेनुसार निवडणुकीची सर्व प्रक्रिया राबवली जाईल. प्रत्येक प्रभागातील परिस्थिती तपासली जात असून, त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. सरकारच्या अधिसूचनेनुसार सर्व प्रक्रिया पार पडली जाईल.
-विजय बालमवार, मुख्य निवडणूक अधिकारी, मनपा
...........
मुंबई महापालिका संख्याबळ
एकूण जागा- २२७
शिवसेना- ९६
भाजप- ८२
काँग्रेस- २९
राष्ट्रवादी- ०८
सपा- ०६
एमआएम- ०२
मनसे- ०१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.