मुंबई

गुगल पे अपडेट केलंय का?

CD

गुगल पे अपडेट केलंय का?
मुंबईत रुजू पाहतेय दुकानदार, व्यावसायिकांना हातोहात फसवण्याची नवी पद्धत
मुंबई, ता. १९ ः सायबर भामटे नागरिकांची परस्पर आर्थिक फसवणूक करण्यासाठी रोज नवनवीन निमित्त, पद्धती शोधून काढत आहेत. या पद्धती समजून फसवणूक टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाय शोधून काढताच भामटे अन्य पद्धतीने नागरिकांना जाळ्यात ओढतात. अलीकडेच शहरात फसवणुकीची नवी पद्धत रुजण्याच्या बेतात आहे. यात एक व्यक्ती गुगल पे किंवा फोन पे कंपनीचा तंत्रज्ञ असल्याचे भासवून दुकानदार, व्यावसायिकांच्या बँक खात्यातील रक्कम हातोहात काढून धूम ठोकतो.
कुर्ला येथील हलाव पूल परिसरात टेलरिंग करणाऱ्या मैनुद्दीन अन्सारी (४५) यांच्या दुकानात १५ जून रोजी असा प्रसंग घडला. इलियास खान नावाचा तरुण रात्री आठच्या सुमारास अन्सारी यांच्या दुकानात आला. खानने स्वतःची ओळख गुगल पेचा तंत्रज्ञ अशी करून दिली. सुरुवातीला ऑनलाईन व्यवहारांबाबत जुजबी चौकशी केल्यानंतर खानने तुम्ही तुमची ऑनलाइन पेमेंट यंत्रणा अपडेट केली आहे का, असे अन्सारी यांना विचारले. वापराव्यतिरिक्त या तंत्रज्ञानाबाबत फारशी माहिती नसलेल्या अन्सारी यांनी नकारात्मक मान डोलावली.
ग्राहकांनी क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन अदा केलेली रक्कम अन्सारी यांच्या बँक ऑफ बडोदातील खात्यावर जमा होत होती. ही यंत्रणा अपडेट न केल्यास भविष्यात ऑनलाइन व्यवहार ठप्प होतील, अशी भीती घालून खान याने अन्सारींचा मोबाईल मागितला. मोबाईलवरील गुगल पे ॲप उघडले. त्यावर अन्सारींकडून घेतलेला चार आकडी पिन क्रमांक टाकून ॲप सुरू केले.
पुढे अन्सारी यांची नजर चुकवून खान याने हातचलाखीने त्यांच्या खात्यावरील १० हजार रुपये अन्य खात्यावर वळते केले. आणखी काही काळ मोबाईलमध्ये रेंगाळून त्याने तो अन्सारी यांना परत केला आणि पुढील १० मिनिटांत ही यंत्रणा अपडेट होईल, असे सांगून निघू लागला. अन्सारी यांना खानबाबत संशय वाटला. त्यांनी त्यास थांबवले आणि गुगल पे खाते तपासले. त्यावरून १० हजार रुपयांची रक्कम काही मिनिटांपूर्वीच इर्शाद अली नावाच्या व्यक्तीच्या आयसीआयसीआय बँक खात्यावर वळती झाल्याचे दिसले. त्यांनी याबाबत खानकडे चौकशी सुरू केली. चोरी पकडली गेल्याने भंबेरी उडालेल्या खान याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. तेव्हा अन्सारी यांच्या शेजारील दुकानचालक विनोद तिवारी तेथे आले. हा सर्व प्रकार लक्षात येताच त्यांनी खान यास पकडून कुर्ला पश्चिमेकडील विनोबा भावे नगर पोलिसांच्या हवाली केले.
विक्रोळीच्या पार्क साईट परिसरात राहणाऱ्या खान याचा आधार कार्डवर भाईंदरचा पत्ता आढळला. लहान दुकानदारांना अशी पद्धत वापरून सहज फसवणे शक्य असल्याचे त्याने प्राथमिक चौकशीत पोलिसांना सांगितले. त्याने अशा प्रकारे शहरात आणखी अनेक दुकानदार, फेरीवाल्यांना फसवले असावे, असा अंदाज पोलिस वर्तवित आहेत. ही माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून खान याची कसून चौकशी सुरू आहे. हा प्रकार सायबर गुन्ह्यात मोडत नाही. जिथे प्रत्यक्ष संपर्क होतो त्या व्यक्तीच्या समोरच त्याच्या खात्यातील रक्कम चोरतो तेव्हा ती फसवणूक ठरते. मात्र ही पद्धत झोपडपट्ट्यांमधील अशिक्षित लहान-मोठे दुकानदार, फेरीवाल्यांना फसवण्यासाठी वापरली जाऊ शकते. फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी कोणालाही ऑनलाइन बँकिंगचे तपशील, पिन क्रमांक देऊ नये. अपरिचित व्यक्तींच्या हाती मोबाईल देणे टाळावे, अशी प्रतिक्रिया सायबर पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.


आकडेवारी

१,८४१ गुन्हे नोंद
- या वर्षी पहिल्या पाच महिन्यांत मुंबईत १,८४१ सायबर गुन्हे नोंद झाले. त्यात फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे सर्वाधिक ३९३ फसवणुकीचे गुन्हे नोंद झाले आहेत. त्याखालोखाल नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचे १५४ आणि डिजिटल अरेस्टच्या ९२ गुन्ह्यांचा समावेश आहे.
- जानेवारी २०२१ ते मार्च २०२५ या काळात नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल आणि १९३०, १९४५ या हेल्पलाइनवर आर्थिक फसवणुकीच्या एकूण ४ लाख ३३ हजार ५७८ तक्रारी प्राप्त झाल्या.
- यातील काही तक्रारी फसवणूक झाल्या झाल्या प्राप्त झाल्याने सायबर पोलिसांना त्यातील सुमारे ६२० कोटी रुपये वाचविणे शक्य झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: डॉक्टर म्हणाले अर्ध्या तासात अ‍ॅडमिट करा… पण पुण्याच्या ट्रॅफिकने घेतला जीव; आता रिक्षावाले काकाच बनले ट्रॅफिक पोलीस

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! कृष्ण जन्माष्टमी अन् दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत झालेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग...

Virender Sehwag: 'धोनीने टीम इंडियातून बाहेर केल्यावर निवृत्ती घेणार होतो, पण तेंडुलकरने मला...', सेहवागचा धक्कादायक खुलासा

Independence Day 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला स्वत:चाच विक्रम; स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केले तब्बल १०३ मिनिटे भाषण

Latest Marathi News Live Updates : मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT