सहलीबाबतच्या प्रश्नांमुळे बांगलादेशी मायलेकीची पोलखोल
भारतीय पासपोर्टवर करणार होत्या प्रवास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः बांगलादेशात पर्यटनासाठी निघालोय, असे सांगणाऱ्या मायलेकीची मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तेथील पर्यटनस्थळांबाबत विचारताच बोबडी वळली आणि पुढील अर्ध्या तासात या दोघींची बांगलादेशी कुंडली उघड झाली.
नवी मुंबईत राहणारी चंपा मंडल (३७) आणि तिची आठ वर्षांची मुलगी हेमा २४ जून रोजी सकाळी एअर इंडियाच्या विमानाने ढाक्याला निघाल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रे इमिग्रेशन अधिकाऱ्यांना सादर केली. या दोघी पहिल्यांदाच बांगलादेश दौरा करत होत्या, शिवाय त्यांच्या भाषेचा लहेजा किंचित बांगलादेशी वाटत होता. त्यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चंपा या नावे पासपोर्ट सादर करणाऱ्या महिलेकडे चौकशी सुरू केली.
बांगलादेशात जाण्याचे निमित्त विचारले. तिने पर्यटनासाठी, असे उत्तर देताच तेथील कोणकोणती पर्यटनस्थळे पाहणार आहात, कुठल्या हॉटेलमध्ये थांबणार आहात, त्याचे बुकिंग आदी प्रश्न विचारले आणि ती महिला गोंधळली. तिच्याकडे भारतीय असल्याचे पुरावे मागण्यात आले. तेव्हा तिने झटकन स्वतःचा जन्मदाखला काढून दिला. पर्यटनासाठी जाणारी कोणती व्यक्ती स्वतःचा जन्मदाखला सोबत आणतो, या विचाराने अधिकारी आणखी संशयित झाले.
दुसरीकडे आठ वर्षांची मुलगी हेमा बांगलादेशात आपल्या कुटुंबाकडे जाणार असल्याचे बोलून गेली. तेव्हा अधिकाऱ्यांनी महिलेकडे कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. तिच्या मोबाईल पडताळणीत ही महिला बांगलादेशातील कुटुंबाशी संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. तसेच मोबाईलमध्ये तिच्या बांगलादेशी पासपोर्टचा सुगावाही लागला. तिच्या नावे दोन बांगलादेशी पासपोर्ट जारी झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर या महिलेने ती बांगलादेशी असल्याचे कबूल केले.
या महिलेचे नाव स्विटी खातून असे असून, ती २००८ मध्ये बांगलादेशी पासपोर्ट आधारे भारतात आली, मात्र ती परत गेलीच नाही. इथे तिने हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले. २०१८ मध्ये तिने बनावट कागदपत्रांआधारे मुंबई कार्यालयातून पासपोर्ट मिळवला, तर तिच्या मुलीचा पासपोर्ट गेल्या वर्षी काढण्यात आला.
इमिग्रेशन अधिकारी गणेश गवळी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात या मायलेकीविरोधात पासपोर्ट अधिनियम, विदेशी व्यक्ती अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. स्विटी उर्फ चंपाला अटक करण्यात आली. तिच्या मुलीला बालसुधारगृहात ठेवण्यात आले.
पतीही बांगलादेशी असल्याचा संशय
या कारवाईची माहिती स्विटी उर्फ चंपाच्या पतीस देण्यात आली, मात्र तो विमानतळ किंवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होईपर्यंत हजर झाला नव्हता. इमिग्रेशन अधिकाऱ्यांना ही व्यक्तीही बांगलादेशी असावी, असा संशय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.