सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : विमानतळ परिसरातून अतिशय दुर्मिळ अशा ‘सायक्स नाईटजार’ पक्ष्याची सुटका करण्यात आली. तब्बल ११ दिवसांच्या उपचारानंतर या पक्ष्याने नैसर्गिक अधिवासात उंच भरारी मारली आहे. एका स्थलांतरित पक्ष्यावरील उपचारांचा मुंबईतील हा पहिलाच प्रयत्न आहे.
मुंबईतील देशांतर्गत विमानतळ परिसरात हा पक्षी एका कर्मचाऱ्याला आढळला होता. हा पक्षी रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) वन्यजीव संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला. संस्थेचे राहुल भोसले आणि प्रथमेश पांचाळ यांनी तातडीने बचाव मोहीम राबवली. पोटाच्या संसर्गामुळे अशक्तपणा आणि भूक लागत नसल्याचे पशुवैद्यकीय तपासणीत निदान झाले होते. त्यानंतर डॉ. रीना देव यांनी तब्बल ११ दिवस उपचार केले होते. अखेर उपचाराअंती या पक्ष्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आले.
------------------------------
नैसर्गिक रंगसंगतीमुळे दृष्टीआड
‘सायक्स नाईटजार’ हा पक्षी अत्यंत दुर्मिळ असून, रात्रीच सक्रिय असतो. कीटक आणि माशांवर उपजीविका करणारा हा पक्षी स्थलांतर करणाऱ्या प्रजातीतील आहे. त्याची नैसर्गिक रंगसंगती, छुप्या हालचालींमुळे क्वचितच नजरेस पडतो.