मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उप परिसरात सौर प्लांट सुविधेचे उद्घाटन
१०० किलोवॉट क्षमतेच्या सौर प्लांटसह रेनवॉटर हार्वेस्टिंग सुविधा
मुंबई, ता. १६ : सौरऊर्जेचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याचा पहिला बहुमान मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे ठाणे उप परिसरास मिळाला आहे. या उप परिसराच्या बळकटीकरणासाठी १०० किलोवॉट क्षमतेच्या सौर प्लांटचे बुधवारी (ता. १६) उद्घाटन केले. तसेच शाश्वत जल व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे आणि प्रभावी तंत्रज्ञान म्हणून रेनवॉटर हार्वेस्टिंग सुविधेचेही उद्घाटन केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या दोन्ही अद्ययावत सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या.
मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे ठाणे उप परिसरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. पीएम-उषा योजनेअंतर्गत १०० किलोवॉट क्षमतेच्या सौर प्लांटसह खेळाचे सुसज्ज मैदान, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अंतर्गत रस्ते, कुंपणभिंत आणि प्रवेशद्वाराचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. विजेच्या वाढत्या मागणी आणि किमतीमुळे संरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि जीवाश्म इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच कार्बन न्युट्रल ग्रीन कॅम्पसच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठाने हे महत्त्वाचे पाऊल टाकले असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
एक लाख ३० हजार युनिट वीजनिर्मिती
यामधील १०० किलोवॉट क्षमतेचा सौर प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला. सुमारे ४८ लाख खर्चून विद्यापीठाने ही सुविधा तयार केली आहे. ठाणे उप परिसरातील १०० किलोवॉट क्षमतेच्या या सौर प्लांटमध्ये नेट मीटरिंग प्रणाली आहे. साधारणपणे १०० किलोवॅट सोलर पॅनेल प्रणालीचा उपयोग करून प्रतिवर्षी एक लाख ३० हजार युनिट वीजनिर्मिती होणार आहे.
रेनवॉटर हार्वेस्टिंग सुविधा
धर्मवीर आनंद दिघे ठाणे उप परिसराच्या बळकटीकरणाचाच भाग म्हणून वर्षाला ३८ लाख लिटर पाण्याचे नियोजन करण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग सुविधा कार्यान्वित करण्यात आली. पाण्याची वाढती टंचाई कमी करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी ही एक शाश्वत आणि प्रभावी पद्धत असून, पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्यासाठी विद्यापीठाने हे पाऊल टाकले आहे. ठाणे शहरातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान व उप परिसरातील छताच्या क्षेत्रफळाची सांगड घातली असता वार्षिक ३८ लाख लिटर पाणी बोअरवेल पीटद्वारे जमिनीत सोडण्यात येणार असून, त्याद्वारे सभोवतालच्या परिसरातील भूजल पातळी वाढणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.