रिक्षा आणि कॅबचालक यांचा बेमुदत बंद
प्रवाशांमध्ये नाराजी; ॲप कंपन्यांनी वाढवले दुप्पट भाडे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः ओला, उबेर, रॅपिडोसारख्या कंपन्यांमुळे ग्राहक तसेच चालकांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी राज्यातील रिक्षा आणि कॅबचालक यांनी बेमुदत बंद पुकारला. त्यामुळे रस्त्यावर चालकांची कमतरता असल्याने परिणामी ॲपवर आधारित कंपन्यांनी भाडे वाढवले आहे. ओला, उबेर या खासगी कंपनीमार्फत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते; मात्र दरकपात तसेच इतर विविध कारणांमुळे ओला, उबेरचालकांनी अचानकपणे संप पुकारला आहे. ओला आणि उबेरचे बुकिंग महाग असून त्याशिवाय ग्राहकांपर्यंत पाेहोचण्यास वेळ लागत असल्याने काळ्या-पिवळ्या टॅक्सींची मुबलक गर्दी पाहायला मिळत आहे. ज्या ओला-उबेरच्या गाड्या बुक होत आहेत त्याला नेहमीच्या तुलनेत दुप्पट भाडे आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
===
परिवहन मंत्रालय, ओला, उबेर, रॅपिडोसारख्या कंपन्यांसमोर हतबल झाले असून, त्यामुळे या बेकायदा कंपन्यांमुळे ग्राहक तसेच चालकांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी राज्यातील रिक्षा आणि कॅबचालक यांनी बेमुदत बंद पुकारला आहे; मात्र सरकारने त्याला प्रतिसाद न दिल्याने शुक्रवारपासून आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे, असे महाराष्ट्र कामगार सभा अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.