मुंबई, ता. १९ ः ऑनलाइन पैसे देण्याचे तंत्रज्ञान विकसित झाल्यापासून घर बसल्या एका क्लिकवर आर्थिक व्यवहार करण्याची सवय अनेकांना लागली आहे. मात्र, तंत्रज्ञानाचा मोह अंगलट येऊ लागला आहे. दहावी शिकलेल्या उत्तरप्रदेशच्या एका तरुणाने खार, वांद्रे परिसरात दुकानदार, टपऱ्यांवर स्वतःचे क्यूआर कोडवर घरबसल्या लाखोंचा गंडा घातला आहे.
खार रेल्वे स्थानक परिसरात व्यवसाय करणारे दिनेश गुप्ता यांच्या दुकानाबाहेर चिकटवलेला क्यूआर कोड स्कॅन करून एका ग्राहकाने पैसे अदा केले होते. मात्र, ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने गुप्ता यांनी ग्राहकाला पैसे अदा केल्यानंतर व्यवहार पूर्ण झाल्याबाबत प्राप्त होणारा संदेश दाखवण्यास सांगितला. व्यवहार पूर्ण झाला होता, मात्र पैसे शिवम दुबे नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर जमा झाल्याचे दिसत होते. या प्रकारानंतर गुप्ता यांनी तातडीने खार पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्याआधारे खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ, निरीक्षक वैभव काटकर यांच्या मार्गदर्शनात दुबेला गोरेगावतून अटक केली.
------------------------------------------
असा लागला सुगावा
खार पोलिस पथकाने गुप्ता यांच्या दुकानाबाहेरील क्यूआर कोडचे तांत्रिक विश्लेषण केले. त्या कोडवरून शिवम दुबेच्या ज्या बँक खात्यात पैसे जमा होत होते. त्या खात्याचे सर्व तपशील संबंधित मिळवले. या खात्याशी संलग्न मोबाईल क्रमांकाआधारे पथकाने दुबेचा नेमका ठावठिकाणा शोधताना त्याला अटक केली.
---------------------------------------
मध्यरात्रीचे कारनामे
- दुबे याने तीन बँकांमधील खात्यांशी संलग्न क्यूआर कोडच्या कलर झेरॉक्स प्रती खार, वांद्रे येथील छोट्यामोठ्या दुकानांच्या, टपऱ्यांच्या भिंतींवर, दरवाज्यांवर चिकटवल्या. दुकाने बंद झाल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास केले. पोलिस त्या ठिकाणचे, सीसीटिव्ही चित्रण तपासून या माहितीची खातरजमा करत आहेत.
- पोलिस कोठडीतील प्राथमिक चौकशीत दुबेने सहा महिन्यात विविध व्यावसायिकांचे ५० हजार रुपये तीन खात्यांवर जमा झाल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. प्रत्यक्षात ही रक्कम लाखोंच्या घरात असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी पोलिसांनी दुबेच्या तिन्ही बँक खात्यांची व्यवहाराची तपासणी केली जाणार आहे.
----------------------------------
गुन्ह्यामागे संघटीत टोळी
काहीच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या दुबेला ही कल्पना कशी सुचली, या गुन्ह्यात त्याला कोणी सहकार्य केले किंवा कोणाच्या आदेशावरून त्याने हे कृत्य केले, याचा तपास पोलिस करत आहेत. या गुन्ह्यात निश्चित आणखी काही आरोपी सहभागी असावेत, असा संशय वरिष्ठ निरीक्षक धुमाळ यांनी व्यक्त केला आहे.
---------------------
सायबर तज्ज्ञांचा सल्ला
ग्राहकांना सुलभ व्हावे म्हणून एकाच क्यू आर कोडच्या अनेक प्रती दुकानदार काढून घेतात. दुकानांच्या बाहेरील भिंतींवरही त्या चिकटवलेल्या आढळतात. रात्री दुकाने बंद केल्यावर क्यूआर कोड तसेच बेवारस राहतात. दुबे प्रमाणे अन्य कोणीही स्वतःचा कोड सहज चिकटवू शकतो. त्यामुळे क्यूआर कोड कायम सुरक्षित ठेवावेत, त्याद्वारे पेमेंट स्वीकारण्याची खातरजमा करणारे यंत्र वापरावे, ग्राहकाने पैसे अदा केल्यावर खात्यावर जमा झाल्याची खातरजमा करावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.