वर्दीच्या धाकापुढे ई-चलान फिके
वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे; सीसीटीव्हीसमोर दर तासाला ७७५ नियमभंग
जयेश शिरसाट : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : सीसीटीव्हींच्या भरवशावर सोडलेल्या शहरातल्या मोठ्या, महत्त्वाच्या चौकांपासून गल्लीबोळातल्या सिग्नलपर्यंत प्रत्येक ठिकाणी वाहनचालक बेधडकपणे वाहतूक नियम मोडत आहेत. सक्तीने आणि त्वरित दंडवसुली होत नसल्याने ई-चलान आलेच तरी ते भरतोय कोण, ही वृत्ती वाहनचालकांमध्ये रुजली आहे. त्यामुळे शासनाने वाहनचालकांना शिस्त लावणे, रहदारी सहज सुरू ठेवण्यासोबत दंडवसुलीत पारदर्शकता आणण्यासाठी सुरू केलेली ई चलान प्रणाली निष्प्रभ ठरत आहे. ई-चलान धाडण्यासाठी बसवलेल्या असंख्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसमोरच दर तासाला सरासरी ७७५ नियमभंग घडत असल्याचे समोर आले आहे.
वर्दीचा धाक
वरळी नाका, सात रस्त्यासारखे प्रचंड रहदारी असलेले चौक असो किंवा मोहम्मद अली रोडप्रमाणे गजबजलेले रस्ते, वाहतूक पोलिस दलातील एकटा शिपाई सिग्नलवर उभा दिसला तरी हजारो वाहने आवर्जून थांबा रेषेच्या अलीकडे थांबलेली दिसतात. ती ओलांडून झेब्रा क्रॉसिंगवर गेलेली वाहने अदबीने स्टॉप लाइनच्या मागे येतात. कितीही घाई असली तरी एकाही वाहनाची सिग्नल मोडण्याची हिंमत होत नाही. कर्कश हॉर्नचा गोंगाट सोडाच, पण सिग्नल हिरवा होईपर्यंत जबाबदार नागरिकाप्रमाणे वाहनाचे इंजिन चक्क बंद केले जाते. सर्वत्र शुकशुकाट असतो.
हाच धाक वेगमर्यादा लादलेल्या महत्त्वाच्या उड्डाणपुलांवर दिसतो. येथे वाहनांचा वेग जोखणारे अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे असूनही नियम सर्रास मोडले जातात. मात्र त्याच ठिकाणी वाहतूक पोलिस किंवा परिवहन विभागाचे वाहन दिसल्यास चालकाचा पाय आपोआप एक्सलेटरवरून हटतो. या परिस्थितीवरून जागोजागी लागलेल्या असंख्य अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपेक्षा सिग्नलवर उभ्या एकट्या वाहतूक पोलिसाचा धाक कैकपटीने अधिक आहे. वाहनचालक त्या वर्दीलाच जुमानत असल्याचे स्पष्ट होते.
६,००० वाहनांमागे एक पोलिस
शहरातील रस्त्यांचे क्षेत्रफळ, वाहनांची वाढती संख्या या तुलनेत वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ तुटपुंजे पडते. शहरातील आणि बाहेरून शहरात येणाऱ्या पाच ते सहा हजार वाहनांमागे एक पोलिस असे प्रमाण आहे. वाहतूक पोलिस दलात सध्या ३,२०० अधिकारी, अंमलदार आहेत. प्रशासकीय, कार्यालयीन कामकाजाला जुंपलेले वगळल्यास उर्वरित मनुष्यबळ आठ तासांच्या तीन पाळ्यांमध्ये रस्त्यावर तैनात असते. त्यातही आठवडी रजा, नैमित्तिक सुट्टीमुळे मनुष्यबळ आणखी तोकडे होते. त्यामुळे शहराच्या प्रत्येक छोट्या- मोठ्या सिग्नलवर मनुष्यबळ तैनात करणे शक्य नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दिवसाला १८,६०० नियमभंग, दीड कोटी दंड
ई-चलान प्रणाली सुरू झाल्यानंतर नियमभंग कमी होण्याऐवजी वाढले. २०२४ची आकडेवारी पाहिल्यास निरनिराळ्या नियमभंगांबद्दल ६७.८४ लाख ई-चलान जारी करून ५४५.४८ कोटींचा दंड बजावण्यात आला. प्रत्यक्षात त्यातील १६३.०९ कोटींचा दंड वसूल झाला. ३८२.३९ कोटींचा दंड वाहनचालकांनी अद्याप भरलेला नाही.
मुंबईसह देशात नागरिकांना जबाबदारीची जाणीव नाही. शासन या नियमभंगांबाबत गंभीर नाही. तंत्रज्ञान आहे मात्र सौम्य कायद्यामुळे दंड भरण्याची सक्ती करता येत नाही. पोलिस फार तर दंड भरा, अशी विनंती करू शकतात. त्यास कोडगे वाहनचालक अजिबात भीक घालत नाहीत. अमेरिका, ब्रिटनसह मध्य पूर्वेतील काही राष्ट्रांमध्ये वाहतूक नियमभंग गंभीर गुन्हा मानला जातो आणि त्याबद्दलचे शासन अवघ्या काही मिनिटांत केले जाते. या देशांमध्ये नियम मोडल्याचा दंड वाहनमालकाच्या बँक खात्यातून परस्पर वसूल केला जातो. तशी तरतूद केल्याशिवाय भारतातील चालकांना शिस्त लागणार नाही
- ए. व्ही. शेणोय, वाहतूकतज्ज्ञ
भारतीय मोटार वाहन कायद्यानुसार बहुतांश नियमभंग तडजोडपात्र (कम्पाउंडेबल) आहेत. त्यामुळे दंडात्मक कारवाईची सक्ती करता येत नाही. मात्र ई-चलानद्वारे होणारा दंड चालकांना सहज भरता यावा, यादृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चलानसोबत ऑनलाइन दंड भरण्यासाठी लिंक, ॲप देण्यात आले आहेत. शिवाय वाहतूक चौकीत जाऊनही ऑनलाइन दंड भरणे शक्य आहे.
- अनिल कुंभारे, सहआयुक्त, वाहतूक विभाग
अशी होते वसुली
नाकाबंदी किंवा रस्त्यांवर नियमित तपासणीदरम्यान अडवण्यात आलेल्या वाहनांवर दंडाची किती रक्कम शिल्लक आहे ते पाहिले जाते. ही रक्कम भरून घेण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय ठरावीक काळात लोक अदालत आयोजित करून ई-चलान निकाली काढली जातात.
आकडेवारी
- ४८३.१४ चौरस किलोमीटर मुंबईचे क्षेत्रफळ
- १,९४१ किलोमीटर रस्त्यांची लांबी
- रस्त्यांचे प्रमाण एकूण क्षेत्रफळाच्या ११.९ टक्के इतके
- ५० लाखांहून अधिक वाहने
- ३० लाखांहून अधिक दुचाकी
- ८ लाखांहून अधिक वाहने दररोज बाहेरून शहरात येतात
- २१.२० मिनिटांत एखादे वाहन सरासरी १० किलोमीटरचा टप्पा पार करते.
- हे प्रमाण दिल्ली, बंगळुरू आणि पुणे या शहरांपेक्षा अधिक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.