व्यावसायिकांसाठी म्हाडाचे कॉर्पोरेट हब
वी वर्कअंतर्गत ११ हजार चौरस मीटरचे गाळे तयार करणार
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : दक्षिण मुंबईसह वांद्रे-कुर्ला काॅम्प्लेक्समधील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे येथे कार्यालय थाटताना भल्याभल्या काॅर्पोरेट कंपन्यांना दम लागत आहे. तसेच नवख्या व्यावसायिकांची मोठी कोंडी होत असून आपले काॅर्पोरेट कार्यालय सुरू करायचे कसे, असा प्रश्न निर्माण होतो. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने गोरेगाव सिद्धार्थनगर येथे वी वर्क संकल्पनेंतर्गत तब्बल १० हजार ८१० चौरस मीटर एवढे चटई क्षेत्रफळाचे कॉर्पोरेट काॅम्प्लेक्स उभारणार आहे. सुमारे ३० मजली उंचीच्या या कार्पोरेट इमारतीत छोटे ऑफिस, काॅन्फरन्स रूम, मीटिंग, लायब्ररी अशा वेगवगेळ्या सुविधा असणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना येथे येऊन काम करता येईल, मीटिंग, सेमिनार घेणे शक्य होणार आहे.
सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाने आता नवीन व्यावसायिकांसाठी काॅर्पोरेट कल्चर असलेली आणि सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा भाग म्हणून गोरेगाव पश्चिम येथील सिद्धानगर (पत्राचाळ) येथे आर-५ हा सुमारे नऊ हजार ९६८ चौरस मीटरचा भूखंड आहे. त्यावर बांधकाम आणि विकास संस्थेच्या माध्यमातून १०५ मीटर उंचीची ३० मजली इमारत उभारणार आहे. त्यामध्ये सुमारे १० हजार ८१० चौरस मीटरच्या जागेवर वी वर्क संकल्पनेवर आधारित खासगी व्यावसायिकांना काम करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. खासगी कंपन्यांच्या कार्यालयांप्रमाणे ही व्यावसायिक इमारती असणार असून त्यामध्ये वीज, वातानुकूलित यंत्रणा, इंटरनेट, पाणी अशा सर्व सोयींनी सज्ज असलेले गाळे तयार केले जाणार आहेत. ते परवडणाऱ्या भाड्यामध्ये व्यावसायिकांना वापरता येईल.
लायब्ररी, स्मार्ट रूम, रेस्टाॅरंट, वॉक वे
- म्हाडाकडून वी वर्कअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या सुसज्ज कॉर्पोरेट इमारती लोकांना कामासाठी सुविधा उपलब्ध करून देतानाच लायब्ररी, स्मार्ट रूम, रेस्टॉरंट उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
- तसेच कामाचा कंटाळा आल्यानंतर पाय मोकळे करता यावेत म्हणून वॉक वे, गार्डन या इमारतीच्या परिसरात उभारले जाणार आहे.
- कॉर्पोरेट कंपन्यामधील अधिकारी-कर्मचारी अनेकदा आठ-दहा दिवसांसाठी मुंबईत येतात. मीटिंग किंवा काम झाले की पुन्हा परत जातात; मात्र हॉटेलमध्ये राहणे खर्चिक असते. त्यामुळे याच ठिकाणी व्यावसायिक इमारतीत लॉजिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू आहे.
-------
प्लग इन, प्लग आऊट
सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात प्लग इन, प्लग आऊट म्हणजे वी वर्कच्या ठिकाणी या ऑनलाइन किंवा लॅपटॉपवर काम करा, काम झाले की प्लग आऊट म्हणजे काम बंद करून घरी जा, अशी संकल्पना असून वांद्रे-कुर्ला संकुलात अनेक कार्यालयांत ही सुविधा आहे. तीच म्हाडा उपलब्ध करून देणार आहे.
- याठिकाणी व्यावसायिक किंवा कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना छोटी कार्यालये एक दिवस, दहा दिवस, महिना आशा कालावधीसाठी परवडणाऱ्या भाड्याने उपलब्ध होणार आहेत.
ग्राफिक्स
- भूखंड - ९,९६८ चौरस मीटर
- व्यावसायिक वापराचे क्षेत्रफळ - १०,८२० चौरस मीटर
- इमारतीची उंची - १०५ मीटर (३० मजले)
-----
ऑक्टोबरमध्ये निविदा
म्हाडा बांधकाम आणि विकास संस्थेच्या माध्यमातून म्हाडा वी वर्क संकल्पनेवर आधारित व्यावसायिक इमारती उभारणार आहे. त्यामुळे यासाठी म्हाडाला कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही. म्हाडाचा भूखंड असल्याने संबंधित संस्थेला शेअरिंग बेसिसवर भूखंड अथवा चटई क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ऑक्टोबरमध्ये म्हाडाकडून निविदा काढली जाणार आहे.
कुठे आहेत वी वर्क सुविधा?
- नेस्को आयटी पार्क गोरेगाव
- रहेजा प्लॅटिनम अंधेरी पूर्व
- २४७ पार्क विक्रोळी
- इनोव्हेट सॉलिटायर कॉर्पोरेट पार्क अंधेरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.