सुधारित बातमी
न्यायालयाच्या आदेशाचे पालन
‘माधुरी’प्रकरणी ‘वनतारा’चा खुलासा
मुंबई, ता. ३ : कोल्हापूर येथील एका जैन मठातील महादेवी ऊर्फ माधुरी या हत्तिणीला वनतारा या पशुसंगोपन केंद्रात हलवण्यात आल्यावरून मोठा गदारोळ सुरू आहे. यावर आता या केंद्रामार्फत खुलासा करण्यात आला आहे. ही हत्तीण जखमी आणि आजारी असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून तिला येथे आणण्यात आले, असे ‘वनतारा’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
जवळपास दीड लाख आजारी आणि जखमी अवस्थेतील प्राण्यांची काळजी घेणारे वनतारा हे केंद्र रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक अनंत मुकेश अंबानी यांच्या संकल्पनेतून चालवले जात आहे. या हत्तिणीला वनतारा केंद्रात ठेवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर टीका होत असल्याने ‘वनतारा’ने हा खुलासा केला आहे.
माधुरीला कोल्हापूर येथील जैन मठात अयोग्य स्थितीत ठेवण्यात आले होते. तिच्या अंगावर अनेक जखमा होत्या. सांधेदुखी, गुडघेदुखीबरोबरच तिचे मानसिक स्वास्थ्य ढासळले होते. याबाबत ‘पेटा’ या प्राणिमित्र संघटनेने अहवाल दिला होता. त्याच्या आधारे वन व पर्यावरण खात्याच्या उच्चस्तरीय समितीने चौकशी करून हत्तिणीची अवस्था सुधारण्याबाबत मठाला संधीही दिली होती; मात्र परिस्थिती न सुधारल्याने अखेर तिला वनतारामध्ये हलवण्याचा आदेश समितीने दिला. मठाने या आदेशाला प्रथम उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या दोन्ही न्यायालयांनी आदेश वैध ठरवला होता. वनतारामधील प्राण्यांसाठी सुसज्ज रुग्णालय, वैद्यकीय सुविधा, खाण्या-पिण्यावर लक्ष आणि प्रशिक्षित माहुत आहे. ही ‘माधुरी’साठी सुरक्षित जागा आहे. वनतारात आता तिची प्रकृती वेगाने सुधारत असल्याचेही वनताराचे म्हणणे आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सर्वांनाच बंधनकारक आहे. आम्ही हत्तिणीचे हित ध्यानात घेऊन प्रशासनाच्या आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत आहोत, असे ‘वनतारा’ने स्पष्ट केले आहे.
----
व्यापारी वापर होता सुरू!
माधुरीला कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच मोहरम आदी मिरवणुकांत नेले जात होते. भीक मागण्यासाठी, तिची पूजा करण्यासाठी भाविकांसमोर मठात पैशांची बोली लावून तिचा व्यापारी वापर केला जात होता, याचेही पुरावे असल्याचा दावाही ‘वनतारा’ने केला आहे.
.....
गैरसमज पसरवणे खेदजनक!
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमान्य असेल आणि हत्तिणीचा ताबा हवा असेल तर मठाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात मागणी करायला हवी. काही अटी पूर्ण करून हत्तिणीला परत कोल्हापूरला हलवण्यास वनताराची हरकत नाही; मात्र असे न करता वनताराविरोधात गैरसमज पसरवण्याची हाती घेतलेली मोहीम खेदजनक आहे, असे ‘वनतारा’ने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.