मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट’ने दोन तासांत!
रेल्वेमंत्री वैष्णव : तीन नव्या रेल्वेंना हिरवा झेंडा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : देशातील पहिली बुलेट ट्रेन सेवा लवकरच सुरू होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद हे ५०८ किमीचे अंतर ताशी ३२० किमीच्या वेगाने अवघ्या दोन तास सात मिनिटांत पार होईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. भावनगर येथून तीन नव्या रेल्वेगाड्यांना वैष्णव आणि तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू असून, ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाददरम्यानचा प्रवास अवघ्या दोन तास सात मिनिटांमध्ये होणार आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातून ही बुलेट ट्रेन सुरू होऊन, वापी, सुरत, वडोदरामार्गे ती अहमदाबादला पोहोचणार असल्याचे वैष्णव म्हणाले. मागील अकरा वर्षांत देशात ३४ हजार किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग टाकण्यात आले असून, सध्या देशात दररोज सरासरी १२ किमी नवा रेल्वेमार्ग तयार केला जात आहे, असा दावा रेल्वेमंत्र्यांनी केला. दरम्यान, भावनगर टर्मिनस येथे झालेल्या कार्यक्रमात भावनगर-अयोध्या कॅंट (साप्ताहिक), पुणे (हडपसर)- रीवा सुपरफास्ट (साप्ताहिक) आणि रायपूर-जबलपूर (दररोज) या तीन नव्या गाड्यांची सेवा सुरू करण्यात आली. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय आणि निमुबेन बांभणिया उपस्थित होते.
-----
तीन नव्या रेल्वेगाड्यांची सुरुवात
- भावनगर-अयोध्या एक्स्प्रेस ही गाडी ११ ऑगस्टपासून दर सोमवारी सुटेल. ती गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील प्रमुख स्थानकांवर थांबेल.
- हडपसर-पुणे ते रीवा सुपरफास्ट एक्स्प्रेस ७ ऑगस्टपासून दर गुरुवारी पुण्याहून सुटेल, तर परतीची गाडी ६ ऑगस्टपासून दर बुधवारी सुटणार आहे.
- रायपूर-जबलपूर एक्स्प्रेस ४ ऑगस्टपासून दररोज धावणार असून, ही गाडी रायपूरहून दुपारी २.४५ वाजता सुटून रात्री १०.४५ला जबलपूरला पोहोचेल. परतीचा प्रवास सकाळी सहा वाजता सुरू होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.