सणासुदीच्या काळात मिठाई, खाद्यतेलांवर एफडीएची करडी नजर
५० मंदिरांना स्वच्छतेसाठी प्रमाणपत्र; दुकाने, वाहने, प्रसाद केंद्रांची तपासणी सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू होणाऱ्या सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, तूप, दूध, फरसाण, सुका मेवा, खाद्यतेल, बेसन आदी पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढीव मागणीचा गैरफायदा घेत भेसळीचे प्रमाणही वाढते. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) राज्यभर तपासणी मोहीम राबवत असून, मिठाई, प्रसाद व खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. एफडीएचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले की, दुकाने, कारखाने आणि विक्री केंद्रांवर फूड इन्स्पेक्टरद्वारे तपासणी सुरू आहे. दर्जाहीन किंवा भेसळयुक्त पदार्थ सापडल्यास ते जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत. अहवालानुसार संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
प्रसादनिर्मिती केंद्रांना प्रशिक्षण
सार्वजनिक मंडळे आणि मंदिरांमध्ये तयार होणाऱ्या प्रसादामध्ये स्वच्छतेचा अभाव टाळण्यासाठी एफडीएमार्फत प्रशिक्षण दिले जात आहे. स्वयंपाकाची जागा, वापरले जाणारे साहित्य व स्वच्छता यावर भर देण्यात येत आहे.
५० मंदिरांना बदलाची संधी
सिद्धिविनायक मंदिर, शिर्डी मंदिर, स्वामी समर्थ मठ अशा राज्यातील ५० प्रमुख मंदिरांना एफडीएकडून स्वच्छतेचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. जानेवारी ते एप्रिलदरम्यान तपासणी करून आढळलेल्या त्रुटींवर मंदिर प्रशासनाला सुधारणा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर नियमांची पूर्तता झाल्यावरच ही प्रमाणपत्रे देण्यात आली.
वाहतुकीवरदेखील लक्ष
खवा, दूध व मिठाई यांसारखे पदार्थ वाहून नेणाऱ्या खासगी बस, ट्रक आदी वाहनांचीही तपासणी केली जात आहे. विशेषतः दुसऱ्या राज्यांतून येणाऱ्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले जात असून, एफडीएच्या नियमांनुसार वाहतूक होते आहे की नाही, हे पाहिले जात आहे.
आगामी काळात गणेशोत्सव व त्यानंतरच्या सणांपूर्वी ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असून, नागरिकांनी भेसळयुक्त पदार्थांपासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
....
सणासुदीची मोहीम २०२४-२५ :
२०२४-२५ या कालावधीत खवा, मिठाई, खाद्य तेल, घी/वनस्पती, रवा, मैदा, भगर या अन्नपदार्थांचे एकूण २,२४४ नमुने घेण्यात आले असून, त्यापैकी १,६५५ नमुने प्रमाणित, ९७ कमी दर्जा, ७१ असुरक्षित, ५६ मिथ्याछाप व ३६५ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. एकूण २५,३९,०८३.६२ किलो अन्नपदार्थाचा साठा (किंमत रु.९,६३,७९,३३८.२३/-) कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे. विश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने कायद्यातील तरतुदींप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती एफडीए प्रशासनाने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.