‘रॅपिडो’विरोधातील याचिका मागे
रिक्षाचालकांवर न्यायालयाचे ताशेरे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः रिक्षाचालक ज्या पद्धतीने ग्राहकांना वागवतात, ज्या पद्धतीने त्यांच्याशी वर्तन करतात, त्यांचा उद्धटपणा आम्ही चांगला ओळखतो, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. ४) याचिकाकर्त्यांचा समाचार घेतला. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर याचिकाकर्त्या रिक्षाचालकांनी याचिका मागे घेतली.
रॅपिडो बाइक टॅक्सीचा तुमच्या उपजीविकेवर कसा परिणाम होईल, रस्त्यावर टॅक्सीचालक आणि रिक्षाचालक ग्राहकांना कसे वागवतात, त्यांची भाषा, त्यांचा उद्धटपणा आम्ही पाहिले आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने रिक्षाचालकांच्या गैरवर्तनाचा सामना केला आहे. ज्या वेळी रिक्षाचालक ग्राहकांना घेऊन जाण्यास नकार देणे थांबवतील तेव्हाच हे सर्व थांबेल, असा शब्दांत न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने रिक्षाचालकांना फटकारले. बाइक टॅक्सींमुळे याचिकाकर्त्यांच्या उपजीविकेच्या कोणत्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत नाही. दरवर्षी इतक्या टॅक्सी बाजारात येतात. उद्या तुम्ही म्हणाल की टॅक्सीचालकांनी टॅक्सी चालवू नये किंवा मेट्रो अजिबात येऊ नये. सरकार यासंदर्भात निर्णय घेण्यास सक्षम आहे, असेही न्यायालयाने या वेळी याचिकाकर्त्यांना सुनावले. तत्पूर्वी, कायद्यांनुसार, केवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) व्यावसायिक वाहने म्हणून नोंदणीकृत आणि पिवळ्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांनाच टॅक्सी म्हणून चालवण्याची परवानगी असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी सुनावणीदरम्यान केला. यावर यासंदर्भात न्यायालयाने सरकारकडे विचारणा केली. त्यावर बेकायदेशीरपणे चालणाऱ्या बाइक टॅक्सींविरुद्ध आधीच कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील प्राची तटके यांनी न्यायालयाला दिली.
...
काय प्रकरण?
रॅपिडोसारख्या ॲपधारक बाइक टॅक्सी शहरात नॉन-ट्रान्सपोर्ट नंबर प्लेट वापरून बेकायदा धावत आहेत. त्यामुळे आपल्या उपजीविकेवर परिणाम होत आहे, असा आरोप ठाण्यातील चार ऑटो रिक्षाचालकांनी दाखल केलेल्या याचिकेतून केला होता. तसेच रॅपिडो, ओला व उबर बाइक ॲपच्या माध्यमातून बेकायदा प्रवासी वाहतूक होत असून, या कंपनीविरुद्ध आयटी कायद्यानुसार, गुन्हा दाखल करावा व बेकायदा ॲप बंद करावे, अशी मागणी याचिकेत केली होती.
...
कारवाई कोठे? दंड किती?
मुंबई (मध्य) रॅपिडो बाइकचालकांवर कारवाई २० हजार रुपयांची दंडवसुली, मुंबई (पश्चिम) १० रॅपिडो बाइकचालकांवर कारवाई, ७७,००० दंडवसुली, मुंबई (पूर्व) १६ रॅपिडो बाइकचालकांवर कारवाई, बोरिवली रॅपिडो बाइकचालकांवर कारवाई, १० हजार रुपयांची दंडवसुली, ठाण्यात २४ रॅपिडो बाइकचालकांवर कारवाई, कल्याण रॅपिडो बाइकचालकांवर कारवाई, एक लाख सात हजार रुपयांची दंडवसुली, वाशी नऊ रॅपिडो बाइकचालकांवर कारवाई, २३ हजार ५०० रुपयांची दंडवसुली, वसई रॅपिडो बाइकचालकांवर कारवाई करून ७३ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.