एसआरएकडून म्हाडाला रखडलेले आणखी आठ झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प मिळणार
प्राधिकरणाकडून विकसक काढण्यासाठीची कारवाई पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून म्हाडाला आणखी आठ रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मिळणार आहेत. त्यासाठी एसआरएने रखडलेले संबंधित प्रकल्प विकसकांकडून काढून घेण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे त्याबाबतचे हेतू पत्र लवकरच म्हाडाला दिले जाणार आहे. त्यामुळे या पुनर्वसन प्रकल्पाला चालना मिळणार आहे. याआधी एसआरएने म्हाडाला तीन प्रकल्प दिले आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरांतील वर्षानुवर्षे रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारने म्हाडा, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, महापालिका अशा वेगवेगळ्या प्राधिकरणांकडे दिली आहे. त्यानुसार म्हाडाच्या जमिनीवरील एकूण २४ प्रकल्प म्हाडाला दिले जाणार होते. मात्र कायदेशीर अडचणी आणि व्यवहार्यता याचा विचार करीत म्हाडाने १७ प्रकल्प घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यापैकी कुर्ला आणि चेंबूर येथील प्रत्येकी एक तर जोगेश्वरी येथील एक अशा तीन प्रकल्पांबाबत एसआरएने म्हाडाला एलओआय दिले आहे. त्याशिवाय आता आणखी आठ प्रकल्प विकसकांकडून काढून घेण्यासाठीची कलम १३(२)ची कारवाई करीत एसआरएने त्यांचे एलओआय रद्द केले आहे. त्यामुळे हे प्रकल्प लवकरच म्हाडाला देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती एसआरएच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली.
२२ हजार झोपड्या
- पहिल्या टप्प्यात म्हाडाला एसआरएने तीन प्रकल्प दिले असून, त्यामध्ये सुमारे ६०० झोपड्या आहे. हे प्रकल्प ५० कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे असल्याने म्हाडाने त्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी गृहनिर्माण विभागाकडे पाठवले आहेत.
- म्हाडाला आणखी आठ प्रकल्प दिले जाणार असून, त्यामध्ये जवळपास २२ हजार झोपड्या आहेत. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागल्यास मोठ्या संख्येने असलेल्या झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
आराखडे, नकाशे एसआरए मंजूर करणार
रखडलेले एसआरए प्रकल्प पूर्ण करण्याच्या कामात आणखी सुलभता यावी म्हणून म्हाडाने संबंधित प्रकल्पांबाबत नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला जावा, अशी राज्य सरकारकडे मागणी केली होती, पण ती मिळालेली नाही. त्यामुळे म्हाडा जे एसआरए प्रकल्प पूर्ण करणार आहे त्याचे आराखडे, नकाशे मंजुरीसाठी एसआरएकडेच जावे लागणार आहे.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.