भटक्या कुत्र्यांची नसबंदी वेगाने करा
आमदार अमीत साटम यांचे पालिकेला पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : दिल्लीत वाढलेल्या कुत्रे चावण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सर्व भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अंधेरी पश्चिमचे भाजप आमदार अमीत साटम यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमदार साटम यांनी पत्रात नमूद केले की, मुंबईत दरवर्षी सरासरी ७० हजार कुत्रे चावण्याच्या घटना घडतात, जे राज्यातील अशा घटनांच्या तब्बल २६ टक्के आहेत. २०२४ च्या अखेरीस पालिकेच्या पोर्टलवर दर आठवड्याला १५० तक्रारी नोंदवल्या गेल्या असून, जानेवारी ते ऑगस्ट २०२५ दरम्यान १०,००० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
साटम यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा संदर्भ देत सांगितले की, २०२२ मध्ये भारतात रेबीजमुळे प्रत्यक्ष मृत्यूंची संख्या १८ हजार इतकी होती. मुंबईत रेबीज प्रतिबंधक लसींचा तुटवडा असून, भटक्या कुत्र्यांकडून बालके, ज्येष्ठ नागरिक व दुचाकीस्वारांवर हल्ल्यांचे प्रकार झपाट्याने वाढले आहेत.
त्यांनी स्पष्ट केले की, भटक्या कुत्र्यांची समस्या नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच पालिकेने नसबंदी मोहिमेला गती द्यावी, निवारागृहे उभारून भटक्या कुत्र्यांचे स्थलांतर करावे. यामुळे हल्ल्यांच्या घटना कमी होतील आणि सार्वजनिक सुरक्षेवरील धोका टळेल, असा दावा त्यांनी केला. ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत सर्व भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानी हलवण्याचा आदेश दिला असून, त्याच धर्तीवर मुंबईतही तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आमदार साटम यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.