मुंबई

म्हाडाला महागड्या घरांचे टेन्शन!

CD

म्हाडाला महागड्या घरांचे टेन्शन!
- ताडदेवची सात घरे विकलीही जाईनात, कुणी सेवा निवासस्थान म्हणून घेईना; कोट्यवधी रुपयांचा महसूल अडकला
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईत सर्वसामान्यांचे गृहस्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाला महागड्या घरांचे टेन्शन आले आहे. हे वाचून तुम्ही चक्रावले असाल, पण ते खरेच आहे. म्हाडाची ताडदेव येथील ‘क्रिसेंट टॉवर’ या गगनचुंबी इमारतीत एक-दोन नव्हे तर तब्बल सात घरे तीन वर्षांपासून विक्रीविना पडून आहेत. सात-साडेसात कोटी रुपये किमतीच्या या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने त्याचा दोन वेळा लॉटरील समावेश केला. मोठ्या अधिकाऱ्यांना सेवा निवासस्थान म्हणून देण्याच्या हालचाली केल्या खऱ्या, पण गेल्या दोन वर्षांत त्याला यश आलेले नाही. त्यामुळे या महागड्या घरांचे करायचे काय, असा प्रश्न म्हाडासमोर उभा राहिला आहे.
राज्याच्या गृहनिर्माण धोरणातील तरतुदीनुसार गृह प्रकल्प राबवताना संबंधित विकसकांनी हौसिंग स्टॉक, प्रीमियमच्या माध्यमातून म्हाडाला ठरावीक घरे देणे बंधनकारक आहे. त्यानुसार सर्वच विकसक म्हाडाला घरे देत असून, त्याची लॉटरीच्या माध्यमातून म्हाडा विक्री करते. त्याला मुंबईकरांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. दरम्यान, २०२२-२३ मध्ये एका खासगी विकसकाकडून म्हाडाला ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमध्ये आठ घरे मिळाली आहेत. त्याच्या विक्रीसाठी म्हाडाने दोन वेळा लॉटरीत समावेश केला, परंतु त्याची विक्री होऊ शकलेली नाही. त्यानंतर ही घरे सेवा निवासस्थान म्हणून म्हाडा अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्याच्या हालचाली म्हाडाने केल्या. दरम्यान, तोही प्रयत्न यशस्वी झाला नसल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

विजेत्यांनी ताबा घेतलाच नाही
म्हाडाने ताडदेवच्या साडेसात कोटी रुपये किंमत असलेल्या सर्व आठ घरांच्या विक्रीसाठी आधी २०२३मध्ये आणि सप्टेंबर २०२४मध्ये मुंबई मंडळाच्या काढलेल्या लॉटरीत समावेश केला होता. मात्र पहिल्या लॉटरील फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. दुसऱ्या लॉटरीत जवळपास ४३ अर्ज आले होते. त्यानुसार लॉटरीत विजेते ठरलेल्यांनी घरांसाठी पैसेही भरले नाहीत आणि ताबाही घेतला नाही, अशी परस्थिती आहे.

सेवा निवासस्थान आवाक्याबाहेर
आपल्याकडे उपलब्ध असलेली घरे अनेकदा म्हाडा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थान म्हणून देते. त्याबदल्यात संबंधिताला म्हाडाकडून द्यावा लागणारा घरभाडे भत्ता वाचतो. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने ही घरे सेवा निवासस्थान म्हणून देण्याच्या हालचाली केल्या खऱ्या, पण १,२००-१,५०० चौरस फुटांच्या घरांसाठी २० हजारांहून अधिकचा मेंटनन्स येतो आहे. त्यामुळे ती घरे सेवा निवासस्थान म्हणून परवडणार नसल्याचे सांगत स्वीकरण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे.

कोट्यवधी रुपयांचा महसूल अडकला
म्हाडाला खासगी विकसकांकडून मिळालेल्या ‘क्रिसेंट टॉवर’मधील एका घराची किंमत सात-आठ कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे सर्व आठ घरांचा विचार करता गेल्या तीन वर्षांपासून घरांची विक्री न झाल्याने ५० कोटींहून अधिकचा महसूल अडकल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

देखभालीचा भार डोक्यावर
विकसकाने २०२२-२३ मध्ये म्हाडाला या घरांचा ताबा दिला आहे. त्यामुळे या घरांचा वापर नसतानाही देखभालीपोटी म्हाडाला दर महिन्याला दीड-दोन लाख रुपये मोजावे लागत आहेत. घरांचा ताबा घेतल्यापासूनचा देखभाल खर्च जवळपास ५० लाखांच्या पुढे गेला असून, तो नाहक भार आहे.

१२ कोटींच्या व्यावसायिक गळ्याची विक्री नाही
म्हाडाचा गोरेगाव बिंबिसारनगरमध्ये सुमारे पाच हजार चौरस फुटांचा व्यावसायिक गाळा आहे. त्याच्या विक्रीसाठी मागील वर्षीच्या ई-लिलावामध्ये समावेश केला होता. तेव्हा केवळ एकाच व्यक्‍तीने बोली लावली होती, पण त्यांनी ताबा घेतला नव्हता. त्यामुळे म्हाडाने आता नुकत्याच काढलेल्या ई-लिलावात या गाळ्याचा विक्रीसाठी समावेश केला आहे. त्यामुळे आता तरी त्याची विक्री होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

Thane Traffic: ठाणेकरांच्या उत्साहाला कोंडीचे ग्रहण, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT