यंदा लेप्टोचा धोका कमी
रुग्णसंख्येत ४२ टक्क्यांची घट; काळजी घेण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत लेप्टो संसर्गात घट झाली आहे. रुग्णसंख्येत सरासरी ४२ टक्क्यांची घट झाली असली तरी गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यातून चालताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबईत २०१२ मध्ये साचलेल्या पाण्यातून चाललेल्या अनेक नागरिकांचा लेप्टोमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने केलेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे लेप्टोमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले; मात्र गेल्या तीन दिवसांत सुरू असलेल्या पावसात अनेक जण पाण्यातून चालत असल्याने, शंका जाणवल्यास ७२ तासांमध्ये प्रतिबंधात्मक उपचार करावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.
....
१५ दिवसांत रुग्णसंख्येत वाढ
ऑगस्टमध्ये सुरू असलेल्या संततधारेमुळे मागील १५ दिवसांत मुंबईत २४४ रुग्ण आढळून आले. सध्या लेप्टोची रुग्णसंख्या ३१६ वर गेली आहे. गेल्या वर्षभरात ५५३ रुग्ण आढळले होते.
.........
साचलेल्या पाण्यातून चालल्यास पहिल्या दोन आठवड्यांत लेप्टोची लक्षणे दिसतात. ताप, अंग दुखणे, डोळे लाल होणे ही मुख्य लक्षणे आहेत. ती दिसल्यास नजीकच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.
- डॉ. दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग
.....
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
- घरात व परिसरात पाणी साचू देऊ नये.
- पाण्यातून चालल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावेत.
- भाज्या-फळे नीट धुवून खावीत.
- हाता-पायांवरील जखमा झाकाव्यात व जंतूनाशक मलम वापरावे.
.....
साथीच्या आजारांचा विळखा
जुलैच्या तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात मलेरिया, डेंगी रुग्णांची संख्या वाढल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. जानेवारी ते ऑगस्टच्या १५ तारखेपर्यंत मलेरियाचे ४,८२५, डेंगीचे १,५६४, गॅस्ट्रोचे ५,५१०, हिपॅटायटीसचे ७०३, लेप्टोचे ३१६ तर चिकुनगुनियाचे ३२८ रुग्ण आढळले आहेत.
---
पावसाळ्यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. डासांची उत्पत्ती होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
- डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, जे. जे. रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.