बेस्ट पतपेढी निवडणूक
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला भाेपळा
शशांक राव यांची बाजी; महायुतीला माफक यश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (बेस्ट पतपेढी) निवडणुकीत जाेरदार धक्का बसला आहे. निवडणुकीत प्रथमच एकत्र आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या ‘उत्कर्ष’ पॅनेलच्या वाट्याला भाेपळा आला आहे. २१ जागांपैकी १४ जागा जिंकून कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनेलने एकहाती विजय मिळवला, तर महायुतीच्या भाजपपुरस्कृत ‘सहकार समृद्धी पॅनेल’ला अवघ्या सात जागांवर समाधान मानावे लागले. या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नऊ वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले.
श्रमिक उत्कर्ष सभाप्रणीत ‘सहकार समृद्धी पॅनेल’कडून आमदार प्रसाद लाड आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर जबाबदारी साेपवण्यात आली हाेती. या पॅनेलमध्ये समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, दि इलेक्ट्रिक युनियन, एससीएसटी वेल्फेअर असोसिएशन, बहुजन एम्प्लॉईज युनियन या पाच संघटनांसह ही निवडणूक लढवली हाेती. दरम्यान, प्रसाद लाड आणि शंशाक राव हे दोघे भाजपचेच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. शंशाक राव यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार यांनी वेळोवेळी संघटनेच्या लढ्यांना मदत केल्याचे सांगीतले.
नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व होते. या वेळी त्यांनी मनसेला सोबत घेतल्याने निवडणुकीत रंगत आली हाेती; मात्र हे नवे समीकरण फसले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट व मनसे यांच्यातील आघाडीला हा मोठा धक्का मानला जात असून, या पराभवाचा परिणाम मुंबई महापालिका निवडणुकांवर दिसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
......
अंतिम निकाल
शशांक राव पॅनेल : १४
सहकार समृद्धी पॅनेल (महायुती) : ७
‘उत्कर्ष’ पॅनेल (ठाकरे गट आणि मनसे) : ०
....
पतपेढीच्या निवडणुकीचे राजकारण करणे योग्य नाही; मात्र ठाकरे बंधूंनी ते केले. पतपेढीच्या निवडणुकीत लोकांनी ठाकरे बंधूंना सपशेल नाकारले.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
......
बेस्ट पतपेढीची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली. त्यात धुव्वा उडाला आहे. ब्रॅंडचा बँड वाजवण्याचे काम जनता करते. ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगले असते; मात्र पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब होते.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
---
भ्रष्टाचारी संचालकांची टोळी हद्दपार करणे हाच आमचा मूळ उद्देश होता आणि तो साध्य झाला. ही निवडणूक प्रत्यक्षात प्रसाद लाड विरुद्ध ठाकरे ब्रॅँड अशी झाली होती. या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला झीरो केले.
- प्रसाद लाड, भाजप आमदार
----
ठाकरे यांची पालिकेवर सत्तेत असताना बेस्टच्या खाजगीकरणाचे धोरण अवलंबले होते. त्यामुळे बेस्ट कामगार देशोधडीला लागला.बेस्ट कामगारांनी त्यांना दिलेले हे उत्तर आहे.
शंशाक राव, कामगार नेते
....
या निवडणूकीत पैशाचा भरमसाठ वापर झाला.सत्तेत असल्यामुळे अगदी १५ लाखात घर देतो असेही आश्वासन दिले, ते आश्वासन पंतप्रधानांच्या १५ लाखाच्या आश्वासनासारखे ठरु नये, अशी आशा आहे. मुख्यमंत्री म्हटले की पतपेढीच्या निवडणूकीचे राजकारण करु नये, मात्र ज्या पध्दतीने भाजप प्रवक्त्यांना उकळ्या फुटल्या, त्यावरुन राजकारण कोण करतंय ते स्पष्ट होते.
हर्षल प्रधान, प्रवक्ते, शिवसेना (उबाठा)
...
विजयी उमेदवारांची यादी
शंशाक राव पॅनेल : मिलिंद आंबेकर, संजय आंब्रे, प्रकाश जाधव, शिवाजी जाधव, शशिकांत अंबुडकर, शिवाजी खरमाटे, उज्ज्वल भिसे, मधुसूदन धेंडे, नितीन कोरे, संदीप किरात, भाग्यश्री डोंगरे (अनुसूचित जाती/जमाती), प्रभाकर धोंगडे (अनुसूचित जमाती), किरण चांगण, दत्तात्रय शिंदे.
........
सहकार समृद्धी पॅनेल : रामचंद्र बागवे, संतोष बेंद्रे, संतोष चतुर, राजेंद्र गोरे, विजय कुमार कानडे, रोहित केणी, रोहिणी बाईत (महिला आरक्षित)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.