इयरफाेनमुळे तरुणाचा
विजेच्या धक्क्याने मृत्यू
मुंबई, ता. २० : धाे-धाे पडणाऱ्या पावसात कानात इयरफाेन लावून रस्त्याने चालणाऱ्या तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना भांडुप येथे उघडकीस आली. रस्त्यात पडलेल्या विजेच्या तारांतील प्रवाह पाण्यात उतरल्याने त्याला विजेचा जाेरदार धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. त्याला स्थानिकांनी ‘पुढे जाऊ नकाेस, शाॅक लागताेय’ असे ओरडून सांगूनही इयरफाेनमुळे काहीच ऐकू न आल्याने त्याच्या जीवावर बेतले.
दीपक पिल्ले (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. भांडुप पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्गावरील पन्नालाल कम्पाउंड परिसरात वीजवाहक तारा पावसाच्या साचलेल्या पाण्यात मोकळ्या सुटल्या होत्या. मंगळवारी (ता. १९) दुपारी दीपक तेथून जात असताना ही घटना घडली. स्थानिकांनी तातडीने बांबू घेऊन साचलेल्या पाण्यातून दीपकला बाहेर काढून रुग्णालयात नेले; मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, स्थानिकांनी याबाबत महावितरणकडे तक्रार केली होती; मात्र वेळेत दुरुस्ती न झाल्याने ही घटना घडल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. भांडुप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. बंदाेबस्तावरील महिला पाेलिसांनी विद्युत प्रवाह बंद करून पुढील अनर्थ टाळला.