जीवघेण्या आजारांचा मुंबईला पडतोय विळखा
मलेरियाच्या प्रकरणांमध्ये ५६ टक्के वाढ
चिकुनगुनियाच्या प्रकरणांमध्ये २० टक्के वाढ
मुंबई, ता. २० : मुंबईत जीवघेण्या आजारांचा विळखा वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मलेरियाच्या प्रकरणांमध्ये ५६ टक्के तर चिकुनगुनियाच्या प्रकरणांमध्ये २० टक्के वाढ झाल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. दरम्यान, एका महिन्यात मुंबईतील मलेरिया आढळलेली ॲनोफिलीस डासांची पाच हजार उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात आली आहेत. सोमवार (ता. १८)पर्यंत १,९५४ ॲनोफिलीस डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट केली गेली. १५ जुलैपर्यंत ३,३९३ स्थळे नष्ट केली गेली. २७ हजार ६०० प्रजनन स्रोतांची तपासणी केली गेली.
गतवर्षी मलेरियाचे ४,०२१ रुग्ण आढळून आले होते; मात्र यंदा ४,८२५ मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने कीटकजन्य आजारांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने २०२४च्या तुलनेत २०२५ मध्ये मलेरिया, डेंगी व चिकुनगुनिया आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत असल्याचे पालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रतिबंधात्मक औषधोपचार आवश्यक
याबाबत अधिक माहिती देताना सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे असेही कळवण्यात आले आहे, की अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात लेप्टोस्पायरोसिस या रोगाचे लेप्टोस्पायरा (स्पायराकिट्स) हे सूक्ष्म जंतू असू शकतात. अशा बाधित पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत.
.....