रेल्वेच्या हट्टामुळे वडाळा जलमय
महापालिका-मध्य रेल्वे प्रशासनाच्या आरोपांच्या फैरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका वडाळा परिसराला बसला. रेल्वेस्थानक आणि चार रस्ता परिसरात तासन्तास तुंबलेल्या पाण्यामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले हाेते. दुकाने बंद, रस्ते ठप्प अन् रहिवासी घरात कैद अशी एकंदरीत परिस्थिती हाेती. या सर्वाला मध्य रेल्वे प्रशासनाची बेफिकिरी आणि हट्टीपणा जबाबदार असल्याचा आरोप महापालिका प्रशासनाने केला आहे, तर मध्य रेल्वे प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.
महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाचे मुख्य अभियंता श्रीधर चौधरी म्हणाले की, वडाळ्यातील साचलेले पाणी रेल्वे रुळाखालून जाणाऱ्या नाल्यांतून जाते. त्यासाठी नाल्याचे दरवाजे उघडणे गरजेचे होते; पण रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळांवर पाणी येईल या भीतीने ते उघडण्यास नकार दिला. महापालिकेने उघडलेले गेटही रेल्वे अधिकाऱ्यांनी बंद करून टाकल्याचा गंभीर आरोप चौधरी यांनी केला.
महापालिकेने वारंवार विनंती करूनही रेल्वे प्रशासन हट्ट सोडायला तयार नव्हते. परिणामी, वडाळा परिसरात पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरात कमरेभर पाणी साचून रस्ते वाहतूक बंद पडली. दुकाने बंद झाली आणि लोक घरात अडकून पडले. कुर्ला, चुनाभट्टी आणि वडाळा स्थानकाजवळ महापालिकेने स्वतःचे पंप लावून पाणी उपसले, तरीही रेल्वे प्रशासनाने सहकार्य करण्याऐवजी केवळ अडथळे उभे केल्याचा आरोप पालिका प्रशासनाने केला आहे. दरम्यान, हट्ट न धरता रेल्वे प्रशासनाने दरवाजे वेळेवर उघडले असते, तर वडाळ्यात पाण्याची परिस्थिती इतकी भीषण झाली नसती. नागरिकांच्या हालांना कारणीभूत रेल्वेचे ‘हट्टी’ धोरण आहे, असा रोष स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
-----
‘दरवाजाचे नियंत्रण पालिकेकडे’
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी जबाबदारी महापालिकेवर ढकलली आहे. ‘दरवाजाचे नियंत्रण महापालिका प्रशासनाकडेच आहे. समुद्राच्या भरतीमुळेही दरवाजे (फ्लड गेट) बंद ठेवावे लागतात,’ असा पवित्रा त्यांनी घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.