हिंदमाता चौकात पंपिंग स्टेशनची क्षमता वाढवणार
महापालिका करणार उपाययोजना
मुंबई, ता. २१ : मुसळधार पावसामुळे मुंबईत पुन्हा पाणी साचल्याने महानगरपालिकेने स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः हिंदमाता चौकातील पंपिंग स्टेशनची क्षमता वाढवण्याचे आणि काही ठिकाणी नाले रुंदवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
१६ ते १९ ऑगस्टदरम्यान मुंबईत तब्बल ९४० मिमी पाऊस झाला. परिणामी, चार वर्षांपूर्वी १५० कोटी खर्चून पूर नियंत्रण प्रकल्प राबवूनही हिंदमाता चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. वाहतूक ठप्प झाली. याचा आढावा नुकताच बैठक घेऊन घेण्यात आला. पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख श्रीधर चौधरी यांनी सांगितले की, शहरातील सहा पंपिंग स्टेशन आणि ५४० डिवॉटरिंग पंप सतत कार्यरत असतानाही मुसळधार पावसाने अनेक भागांत पाणी तुंबले. सध्या पंपिंग स्टेशनची क्षमता ताशी ५५-६० मिमी पावसावर नियंत्रण ठेवण्याची आहे, मात्र गेल्या आठवड्यात ताशी १५० ते २०० मिमी पाऊस झाल्याने ही क्षमता अपुरी ठरली. हिंदमाताला सध्या साठवण तलाव व सात पंप असून, ताशी ३,००० घनमीटर पाणी उपसा करता येतो, मात्र बदलत्या हवामानामुळे ही क्षमता वाढवणे आवश्यक असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
नाले रुंदावण्याचा आराखडा तयार करणार
याशिवाय गांधी मार्केट परिसरासह अनेक ठिकाणी नाले रुंदावण्याचा आराखडा तयार केला जात आहे. त्यासाठी आयआयटी किंवा व्हीजेटीआयसारख्या संस्थांची नेमणूक करून सर्वेक्षण करण्याची योजना आहे. मुंबईत सध्या ३,८०० किमी लांबीचे नाले असून, त्यात २६१ किमी प्रमुख नाले, ४११ किमी लहान नाले यांचा समावेश आहे, मात्र वाढती लोकसंख्या, बदलते पावसाचे स्वरूप आणि वाढलेला जलप्रवाह लक्षात घेता ही नालेरचना आता अपुरी पडत असल्याचे दिसते.
------------
पावसाळ्यासाठी ५४० पाणीउपसा पंप तैनात होते. मुसळधार पावसात ते सर्वच्या सर्व सुरू होते. पाणी तुंबलेल्या सर्व ठिकाणांचा आढावा घेणे सुरू आहे. पाणी तुंबण्याच्या कारणांची चाचपणी केली जात आहे. त्यावर योग्य उपाययोजना केल्या जातील.
- अभिजित बांगर , अतिरिक्त आयुक्त
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.