सेंट जॉर्ज रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र वॉर्ड अद्याप बंदच!
मुंबई, ता. २१ : दक्षिण मुंबईतील सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात मनोविकृतीशास्त्र वॉर्ड उपचारासाठी अत्याधुनिक आहे, मात्र हा वॉर्ड अद्याप बंदच आहे. त्यामुळे हा वॉर्ड सुरू करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे आमदार अमिन पटेल यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिले आहे.
सेंट जॉर्ज रुग्णालयात आधीपासूनच मानसोपचार विभागाचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) कार्यरत आहे, मात्र अंतर्गत उपचारासाठीची सोय न झाल्याने रुग्ण व कुटुंबीयांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या वॉर्डसाठीचे पायाभूत काम पूर्ण झाले असून, पायाभूत सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिका यांची उपलब्धता आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) घालून दिलेल्या सर्व निकषांची पूर्ततादेखील येथे झाली आहे. तरीदेखील वर्ग-४ कर्मचारी, साफसफाई कामगार, परिचर व सहाय्यक कर्मचारी, उपलब्धता न झाल्यामुळे हा विभाग बंदच आहे.
-वॉर्ड सुरू न होणे ही गंभीर बाब : अमीन पटेल
आवश्यक सुविधा असूनही वॉर्ड सुरू न होणे ही गंभीर बाब आहे. मानसिक आरोग्यासाठी उपचार मिळावे ही रुग्णांची गरज आहे, परंतु वॉर्ड सुरू नसल्याने रुग्णांसमोर अडचण निर्माण झाल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून आवश्यक कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी केली आहे.