‘मिठी’प्रकरणी कंत्राटदाराला अटक
गाळ न उपसता २७ कोटींची देयके मंजूर केल्याचा दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी (ता. २१) कंत्राटदार शेरसिंह राठोडला अटक केली. गाळ न उपसता राठोडच्या कंपनीने बनावट देयके सादर करून महापालिकेकडून सुमारे २७ कोटी मंजूर करून घेतल्याचा दावा आर्थिक गुन्हे शाखेने दंडाधिकारी न्यायालयात केला. न्यायालयाने त्यास २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
राठोड याच्या कंपनीने २०२१-२२ मध्ये मिठी नदीतील गाळ उपसून तो अन्यत्र टाकण्यासाठी सुमारे २९.६ कोटींचे कंत्राट मिळवले होते. गाळ टाकण्यासाठी राठोडसह सर्वच कंत्राटदारांनी भिवंडी, पनवेल परिसरातील भूखंड निवडून जमीन मालकाशी करार केले; मात्र तपासादरम्यान हे करार बनावट असल्याचे स्पष्ट झाले. मुळात कंत्राटदारांनी गाळ उपसून ठरावीक ठिकाणी टाकल्याच्या निव्वळ नोंदी करून तसा आभास निर्माण केला, असेही स्पष्ट झाले होते. राठोडने उपसलेला गाळ टाकण्यासाठी तीन जमीन मालकांशी करार केला होता. त्यापैकी एका मालकाचा करार करण्याच्या दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू झाल्याचे आढळले. अन्य दोन जमीन मालकांनी राठोड किंवा त्याची कंपनी परिचित नसल्याचे सांगितले.
----
यंत्र भाडेतत्त्वावर घेतल्याचाही आभास
गाळ उपसण्यासाठी कंत्राटदारांनी ‘स्लिट पुशर’ हे अद्ययावत यंत्र भाडेतत्त्वावर घ्यावे, अशी अट महापालिकेने घातली होती. राठोड याच्या कंपनीने बनावट कागदपत्रे, करार, नोंदी तयार करून हे यंत्र भाड्याने घेतल्याचाही आभास निर्माण केला, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी न्यायालयाला दिली. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने राठोडसह पाच कंत्राटदार, मध्यस्थ आणि पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला होता. केतन कदम आणि जय जोशी या दोन मध्यस्थांना अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केले होते.