धाे धाे पावसात मुंबईला
‘नीप टाइड’चा फटका
विविध यंत्रणांत समन्वयाचा अभाव; जुन्या व्यवस्थाही कारणीभूत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : पावसासाठी सज्ज असल्याचा दावा महापलिकेने केला होता; मात्र मुसळधार पावसाने तीन वेळा मुंबई शहर ठप्प केले. यावरून जाेरदार टीका झाल्यानंतर पालिकेने कारणमीमांसा सुरू केली आहे. ‘नीप टाइड’ अर्थात भरती आणि आहाेटीमधील कमी अंतर किंवा ओहाेटीदरम्यान पाणी कमी न झाल्याने नाल्यांतील पाण्याला अडथळा निर्माण झाला. त्याचवेळी ३०० मिलिमीटर पाऊस झाल्याने शहरात पाणी तुंबल्याचे कारण सांगितले जात आहे.
मुंबईत आतापर्यंत तीन वेळा अति मुसळधार पाऊस झाला असून, २६ मे, १८ आणि १९ ऑगस्टला अतिमुसळधार पावसाने मुंबईला झाेडपून काढले. कुलाबा वेधशाळेत २६ मे रोजी २९५ मिमी इतका पाऊस झाला. मागील १०७ वर्षांत मुंबईत मे महिन्यात एका दिवसात झालेला सर्वाधिक पाऊस हाेता. त्यानंतर १८ आणि १९ ऑगस्टला ३०० मिमीच्या आसपास पाऊस झाला. त्यातच नीप टाइडमुळे समुद्राची पाणीपातळी कमी न झाल्याने सर्व यंत्रणा सज्ज असताना नाल्यांतील पाणी समुद्रात जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने शहरात सर्वत्र पाणी साचून मुंबई ठप्प झाली होती. मुंबईत रेल्वे, म्हाडा, एमएमआरडीए, मेट्रो, एमएमआरसीएल अशी विविध प्राधिकरणे आहेत. यांचा पालिकेशी समन्वयाचा अभाव दिसतो. त्यांच्यात एकवाक्यता नसल्याने मुंबईला फटका बसत असल्याचे दिसते.
पाणी निचऱ्याचे पर्याय
अतिवृष्टीमुळे संपूर्ण शहरात पाणी साचून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीसह विमान सेवाही बाधित झाली हाेती. यामुळे पालिकेचे नियोजन फसल्याचा आरोप होऊ लागला आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. यात पर्यजन्य जलवाहिन्या, मॅनहोल्स, पाणीउपसा केंद्रे, पाणीउपसा पंप असे विविध पर्याय आहेत. याशिवाय पावसाळापूर्व नालेसफाईवरदेखील भर दिला जातो.
पम्पिंग स्टेशनवर मदार
शहरातील सहा पम्पिंग स्टेशन आणि ५४० डिवॉटरिंग पंप सतत कार्यरत असूनही मुसळधार पावसाने अनेक भागांत पाणी तुंबले. सध्या पम्पिंग स्टेशनची क्षमता ताशी ५५-६० मिमी पावसावर नियंत्रण ठेवण्याची आहे. गेल्या आठवड्यात ताशी १५० ते २०० मिमी पाऊस झाल्याने ही क्षमता अपुरी पडली. हिंदमाताला सध्या साठवण तलाव व सात पंप असून, ताशी तीन हजार घनमीटर पाणीउपसा करता येतो; मात्र बदलत्या हवामानामुळे ही क्षमता वाढवणे आवश्यक असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सहा उदंचन केंद्रे कार्यरत
मुंबईत एकूण सहा उदंचन केंद्रे कार्यरत आहेत. हाजी अली, लव्हग्रोव्ह (वरळी), क्लीव्हलँड बंदर (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड), इर्ला (जुहू), गजदरबंध (सांताक्रूझ) यांचा समावेश आहे. या केंद्रांत ४३ पंप बसवण्यात आले आहेत. प्रत्येक पंपाची क्षमता प्रतिक्षणी सहा हजार लिटर पाणी उपसण्याची आहे. सर्व पंपांची एकत्रित क्षमता प्रतिक्षणी तब्बल दाेन लाख ५८ हजार लिटर एवढी आहे. संगणकीय प्रणालीद्वारे या पंपांचे संचालन केले जाते. क्षमतेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने अडचण निर्माण होते.
-----
३० हजारांहून अधिक पाणी प्रवेश बिंदू
मुंबईत स्टॉर्म वॉटर डिस्पोजल सिस्टीमअंतर्गत मुंबईत सुमारे दाेन हजार किमी खुले ड्रेन्स आणि ४४० किमी बंद ड्रेन्स आहेत. तसेच १८६ पाणी समुद्रात सोडण्यासाठीचे मार्ग आणि ३० हजारांपेक्षा जास्त निचरा करण्यासाठी पाणी प्रवेश बिंदू आहेत.
-----
जीर्ण यंत्रणेचा फटका
मुंबईत बऱ्याच ठिकाणी जुनी मलनिस्सारण व्यवस्था असून, ती कालबाह्य झाली आहे. तिची तुलनेने कमी क्षमता असून काही ठिकाणी त्यांची खोली समुद्रसपाटीपेक्षा खाली आहे. अनेक मलनिस्सारण वाहिन्यांत मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असून याचा फटका बसत आहे. हे ड्रेनेज मोठे करता येतील का किंवा त्यांना नवीन ड्रेनेजची जोड देता येईल का, अशा अनेक पर्यायांची चाचपणी केली जात आहे.
मुंबईत सुमारे ७५ हजार मॅनहाेल
मुंबईत पर्जन्य जलवाहिनी विभागाचे शहर भागात ३२ हजार आणि दोन्ही उपनगरे मिळून सुमारे ७५ मॅनहोल आहेत. मॅनहाेलची नियमित साफसफाई न होणे, झाकणावर कचरा साचणे, अंतर्गत अडथळे यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे पाणी तुंबते.
............
नाल्यांची साफसफाई व्यवस्थित करून अतिरिक्त पंप बसवले होते. ते सर्व व्यवस्थित चालले; मात्र यंदा कमी वेळेत अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी पाणी तुंबले. याची करणे आम्ही जाणून घेत असून, त्यावर आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.
- अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)
----
नीप टाइड म्हणजे काय?
नीप टाइड भरती आणि ओहोटीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. ओहोटी झाल्यानंतरदेखील समुद्रातील पाण्याचा पातळी अधिक खाली न जाता दोन ते अडीच मीटर कायम राहते आणि त्यातच भरती प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पावसाचे पाणी समुद्रात जाण्यास अडथळा निर्माण होतो.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.