रमेश गायचोर यांना तात्पुरता जामीन
शहरी नक्षलवाद प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : शहरी नक्षलवाद प्रकरणात अटकेत असलेले कबीर कला मंचचे रमेश गायचोर यांना आजारी वडिलांना भेटण्यासाठी उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. २६) तात्पुरता जामीन मंजूर केला.
गायचोर सप्टेंबर २०२०मध्ये अटक झाल्यापासून त्यांच्या ७६ वर्षीय वडिलांना भेटलेले नाहीत, असे न्या. अजय गडकरी आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने नमूद केले. तसेच गायचोर यांना २५,००० रुपयांच्या मुचलक्यावर ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या तीन दिवसांसाठी तात्पुरता जामीन मंजूर केला. यासंदर्भात विशेष एनआयए न्यायालयात केलेला अर्ज फेटाळल्यानंतर गायचोर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. वडिलांची प्रकृती बिघडली असून, त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून अंतरिम जामीन द्यावा, अशी मागणी गायचोर यांनी याचिकेद्वारे केली होती. या प्रकरणातील अन्य सह-आरोपींनाही यापूर्वी अशाच कारणांसाठी तात्पुरता किंवा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तथापि आपल्या प्रकरणात वस्तुस्थितीचा विचार करण्यात विशेष न्यायालय अपयशी ठरले. विशेष न्यायालयाने आजारी वडिलांना भेटण्याची परवानगी देण्यामागील मानवतावादी दृष्टिकोन विचारात घेतला नाही, असा दावाही गायचोर यांनी केला होता. एल्गार परिषदेच्या आयोजनात सहभागी झाल्याचा आणि जमावाला भडकविल्याचा आरोप गायचोर यांच्यावर असून, एनआयएने त्यांना ७ सप्टेंबर २०२० रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते कारागृहात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.