तलावांमध्ये गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक पाणीसाठा!
सातही तलाव पूर्ण क्षमतेने भरले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : अखेर मुंबईकरांना पाण्याच्या बाबतीत मोठा दिलासा मिळाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, एकूण साठा ९६.५१ टक्के इतका आहे. विशेष म्हणजे हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक आहे.
गेल्या तीन वर्षांची तुलना करता आजच्या दिवशी २०२३मध्ये फक्त ९०.०९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्या वेळी तलावामध्ये जवळपास १० टक्के कमी पाणीसाठा होता. २०२४मध्ये ९५.७५ टक्के पाणीसाठा होता. त्यात थोडी सुधारणा दिसली होती. तर २०२५मध्ये तब्बल ९६.५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वोच्च पाणीसाठा आहे. यावरून यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तलावांची स्थिती अधिक समाधानकारक असल्याचे स्पष्ट होते.
पाणीकपातीची शक्यता नाही
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सात तलावांच्या साठ्यामुळे पुढील काही महिने तरी पाणीकपातीची शक्यता नाही, असा दिलासा मुंबईकर नागरिकांना मिळाला आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या अखेरीस तलावातीला पाणीसाठा कमी असल्याने टंचाईची भीती निर्माण होत होती. मात्र यंदा पावसाने साथ दिल्याने पाण्याचा साठा सुरक्षित झाला आहे.
पाऊस आणि एकूण नोंद
भांडुप कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी (ता. २९) १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण २४१० मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळेच तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक साठा यंदा नोंदवला गेल्यामुळे मुंबईकरांना निश्चितपणे दिलासा मिळाला आहे. पावसाने अशीच साथ दिल्यास आगामी उन्हाळ्यातही पाण्याचे संकट ओढवणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
गेल्या तीन वर्षांची तुलना
२०२३ : फक्त ९०.०९ टक्के साठा (तलाव जवळपास १० टक्के कमी)
२०२४ : ९५.७५ टक्के साठा (थोडा सुधारलेला)
२०२५ : तब्बल ९६.५१ टक्के साठा (गेल्या तीन वर्षांतील सर्वोच्च)
तलावनिहाय परिस्थिती
* मोडक सागर, तानसा, तुळशी आणि विहार हे चार तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडले आहेत.
* अपर वैतरणा : ९५ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याने पाणी सोडले जात आहे.
* मध्य वैतरणा : ९५ टक्क्यांपेक्षा अधिक भरला असून, दोन झडपा उघडण्यात आल्या आहेत.
* भातसा : ९५ टक्क्यांपेक्षा जास्त साठा असून, झडपा उघडण्यात आल्या आहेत.
मुंबई तलाव साठा - २९ ऑगस्ट २०२५ (सकाळी ६ वा.)
तलावांच नावे उपलब्ध पाणीसाठा (टक्केवारी)
अपर वैतरणा २,१९,३३२ (९६.६०)
मोडक सागर १,२८,९२५ (१००)
तानसा १,४३,००४ (९८.५७)
मध्य वैतरणा १,८५,५०,७ (९५.८५)
भातसा ६,८४,३८८ ( ९५.४५)
विहार २७,६९८ (१००)
तुलसी ८,०४६ (१००)
एकूण साठा : १३,९६,९०१ (९६.५१ टक्के)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.