जीएसटी कपातीमुळे बाजारात चैतन्य
व्यापाऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत
मुंबई, ता. ४ : सरकारने तब्बल ९० वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर व्यापारी व ग्राहक दोघांमध्येही आनंदाची लाट पसरली आहे. दिवाळीसाठी ग्राहकांची अधिक गर्दी होणार असून, बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण होत असल्याचे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनसह विविध व्यापारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
कपडे, पादत्राणे, टीव्ही, कार अशा वस्तूंवरील जीएसटी कमी झाल्याने ग्राहकांचा खर्च कमी होणार आहे. २,५०० पेक्षा कमी किमतीच्या कपड्यांवर केवळ पाच टक्के जीएसटी राहणार आहे, तर दैनंदिन वापरातील अनेक खाद्यपदार्थ, व्यायाम पुस्तके आणि स्टेशनरी यांनाही जीएसटीमधून सूट मिळाली आहे; परंतु अडीच हजारांपेक्षा जास्त किमतीच्या वधू-वस्त्रांवर १८ टक्के जीएसटी लागू राहणार असल्याने या विभागातील उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांमध्ये थोडीशी नाराजी आहे.
----
जीएसटी कपातीमुळे बाजारपेठांत उत्साह आहे. व्यवसायात वाढीची अपेक्षा असून ग्राहकांनाही थेट फायदा होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी व्यापाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने बंपर ठरणार आहे.
- विरेन शाह, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन
---
लष्करी ड्रोन आणि बॅटरीसारख्या ड्रोन घटकांना सूट देण्यात आली आहे. व्यावसायिक उपयोग किंवा लष्करी सुधारणांमुळे ड्रोन उद्योगाला चालना मिळेल. या क्षेत्रात तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन मिळेल.
- अमित महाजन, संचालक, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लि.
---
जीएसटी भरणाऱ्या करदात्यांपैकी ६५ टक्के लोकांचे उत्पन्न ८ ते १० हजार आहे. त्यांना कर लावणे चुकीचे आहे. काही राज्यांतील निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन हा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंवर शून्य टक्के कर हवा.
- विश्वास उटगी, अर्थतज्ज्ञ
===
खेळण्यांवरील कमी जीएसटीमुळे ग्राहकांची खरेदी वाढेल. त्यामुळे देशांतर्गत खेळणी उद्योगालाही बळकटी मिळेल.
- विजेंद्र बाबू एन., सीईओ मायक्रो प्लॅस्टिक्स प्रा. लि.
===
वैयक्तिक जीवा आणि आरोग्य विमा पॉलिसींना जीएसटीमधून सूट दिल्याने मध्यमवर्गाला थेट फायदा होईल. ग्राहकांची खरेदी क्षमता वाढेलच, शिवाय मागणी आणि अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल.
- अरविंद भन्साळी, अध्यक्ष, आयएमसी, अप्रत्यक्ष कर समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.