‘अभ्युदय’च्या पुनर्विकासासाठी तीन कंपन्या मैदानात
सोमवारी निविदा उघडणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : दोन दशकांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अभ्युदयनगरचा पुनर्विकास करण्यासाठी तीन खासगी कंपन्या मैदानात उतरल्या आहेत. म्हाडाने मागवलेल्या निविदानुसार तीन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. त्या सोमवारी (ता. ८) उघडल्या जाणार आहेत.
अभ्युदयनगरात सध्या ४८ इमारती असून २०८ चौरस फुटांची ३,४१० घरे आहेत. या वसाहतीच्या पुनर्विकासाची बांधकाम व विकास या तत्त्वावर विकसक नेमण्यासाठी म्हाडाने सुरुवातीला गेल्या वर्षी ऑक्टोबरला निविदा काढली होती. पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन घराचे चटई क्षेत्रफळ किमान ६३५ चौरस फूट असावे, अशी अट म्हाडाने घातली होती. सहा वेळा मुदतवाढ देऊनदेखील एकाही विकसकाने निविदा भरली नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या मंजुरीने म्हाडाने पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ ६३५ वरून ६२० पर्यंत कमी करीत विकसक नेमण्यासाठी २९ मे रोजी नव्याने निविदा मागवल्या होत्या. इच्छुकांना निविदा सादर करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर होती. त्यानुसार तीन विकसकांकडून निविदा सादर करण्यात आल्या आहेत.