२७१ एनआरआय विद्यार्थ्यांनी घेतला
राज्यातील विविध महाविद्यालयात प्रवेश
मुंबई, ता. ११ : यंदाच्या शैक्षणिक वर्षात परदेशातील आणि एनआरआय विद्यार्थ्यांनी विविध पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) एकूण २७१ परदेशातील व एनआरआय पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना राज्यभरातील १७ महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची निवड केली असून, काहींनी व्यवस्थापन आणि कायदा अभ्यासक्रम निवडले आहेत.
सीईटी कक्षाच्या माहितीनुसार, विविध अभ्यासक्रमांसाठी परदेशातील ५२ देशांमधून ४३० विद्यार्थ्यांनी आणि परदेशात स्थायिक असलेल्या भारतीय वंशाच्या ६८२ एनआरआय विद्यार्थ्यांनी प्रवेश पोर्टलवर नोंदणी केली होती. परदेशी अर्जदारांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी नेपाळमधून (७४) होते, त्यापाठोपाठ संयुक्त अरब अमिरातीतून (७२) विद्यार्थी होते. याशिवाय इंडोनेशिया, कतार, सौदी अरेबिया आणि ओमान येथूनही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी स्वारस्य दाखवले. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, अर्जेंटिना आणि युनायटेड किंगडममधील विद्यार्थ्यांनीही सीईटीसाठी नोंदणी केली, यंदाच्या शैक्षणिक वर्षात वाढलेल्या या प्रवेशामुळे राज्यातील उच्च शिक्षण संस्था संस्था परदेशी विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी २७१ विद्यार्थ्यांना राज्यातील १७ संस्थांमध्ये यशस्वीरीत्या प्रवेश मिळाला आहे. यामध्ये १४३ विद्यार्थ्यांनी संगणक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) यामधील पदवी अभ्यासक्रमांची निवड केली असून, तंत्रज्ञान क्षेत्रावरील त्यांचा कल अधोरेखित होतो.
दरम्यान, पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) या संस्थेला सर्वाधिक पसंती मिळाली असून ६८ विद्यार्थ्यांनी विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये प्रवेश घेतला आहे. कायदा शाखेत १२ विद्यार्थ्यांनी तीन वर्षे व पाच वर्षांचे अभ्यासक्रम घेतले आहेत, तर व्यवस्थापनशास्त्र विभाग (पीयूएमबीए ) मध्ये ९ विद्यार्थ्यांनी एमबीएसाठी प्रवेश घेतला आहे. यासोबत डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयएलएस लॉ कॉलेज, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, रावेत या प्रमुख संस्थांनी परदेशी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मुंबईतील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट यांनाही परदेशी विद्यार्थ्यांनी आपली पसंती दर्शवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.