प्राणिसंग्रहालयातील साफसफाईसाठी २७ कोटींचा खर्च
माहिती अधिकारांतर्गत पालिकेची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालय विभागाने गेल्या पाच वर्षांत साफसफाईसाठी (हाऊसकीपिंग) केलेला खर्च तब्बल २७ कोटी ११ लाख नऊ हजार एक रुपये इतका झाल्याची माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकारांतर्गत एजदी फरोख मोतिवाला यांनी विचारलेल्या प्रश्नाला सार्वजनिक माहिती अधिकारी डॉ. कोमल राऊल यांनी उत्तर दिले.
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ ५३ एकर असून, प्राणिसंग्रहालय म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यातील सर्व भागाच्या होणाऱ्या स्वच्छतेच्या खर्चाचा यात समावेश आहे. परिसर, पिंजरे, पाणी यांचादेखील यात समावेश आहे. या खर्चामध्ये केएचएफएम आणि ऑरा एफएमएस प्रा. लि. या दोन कंपन्यांचा सहभाग आहे. या कंत्राटांना मान्यता देण्याचे अधिकार स्थायी समितीने दिल्याचेही उत्तरात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या मान्यतेनेच हा खर्च होत असल्याचेही यात नमूद आहे.
आरटीआय कार्यकर्ते एजदी फरोख मोतीवाला यांनी या खर्चावर आक्षेप घेतला आहे. उद्यानाच्या निव्वळ एका खर्चावर पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च ही निव्वळ उधळपट्टी आहे. आधीच पेंग्विनच्या देखभालीच्या खर्चावरून उद्यान विभागाचे दिवाळे निघाले असताना स्वच्छतेवर इतका खर्च होत असेल, तर त्याची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही मोतीवाला म्हणाले. याबाबत योग्य तो अभ्यास करून पुढील कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले.
प्राणीपक्ष्यांची मांदियाळी
राणी बागेत साधारणपणे ३३० प्राणी आहेत, ज्यात विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी यांचा समावेश आहे. या प्राणिसंग्रहालयात हत्ती, वाघ, हरीण, मगर, पेंग्विन, अस्वल, तरस, विविध प्रकारचे पक्षी आणि इतर अनेक प्राणी आहेत. वाघ (शक्ती आणि करिश्मा) आणि पेंग्विन ही या प्राणिसंग्रहालयाची मुख्य आकर्षणे आहेत. याशिवाय राणी बागेत बिबट्या, माकडे, हत्ती, पाणघोडे, मगरी आणि इतर अनेक प्राणीदेखील आहेत. विविध प्रकारचे रंगीत करकोचे, बगळे आणि सारस यांसारखे पाणथळ पक्षीदेखील येथे आढळतात. याचीदेखील दैनंदिन साफसफाई करावी लागते.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.