Cruelty Against Pet Dog in Mumbai’s JJ Marg
esakal
पाळीव श्वानाची सुटका करण्यासाठी वांद्रे येथील एका वयोवृद्धाने माथेफिरू तरुणाशी जखमी होईपर्यंत दोन हात केले होते, याच्या विरुद्ध चीड आणणारी घटना जे. जे. मार्ग परिसरातील इमामवाड्यात घडली. एका तरुणाने पाळीव श्वानास अनेक दिवस उपाशी ठेवले. आजारपणाने विव्हळणाऱ्या श्वानास उपचारासाठी न नेता त्यास मृत्यूच्या दारात लोटले. २२ सप्टेंबरला या श्वानाने मान टाकली.
गेल्या वर्षभरात मालकाने या श्वानाला साधे घराबाहेर फिरण्यासाठीही नेले नव्हते. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हा श्वान त्याच्याच विष्ठेत दिवस ढकलत होता. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी श्वानाचा मालक सादिक शेख (वय ३२) याच्याविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील कलमानुसार गुन्हा नोंदवला. ही कारवाई सादिकचे नातेवाईक अब्दुल सत्तार (७१) यांच्या तक्रारीवरून करण्यात आली.
सत्तार बांधकाम व्यावसायिक आहेत. ते पत्नी, दोन मुलांसह के. जी. एन सोसायटीत राहतात. याच घरात सादिक राहतो. सत्तार यांच्या पत्नी झुलेखा यांच्या भावाने त्यास दत्तक घेतले होते. चार वर्षांपूर्वी मुंब्रा येथे राहणारा सादिक सत्तार कुटुंबासोबत राहू लागला. त्याने तेथील वास्तव्यात लॅब्रेडोर प्रजातीचा श्वान पाळला. टायसन असे त्याचे नाव ठेवले.
मुंबईत सत्तार यांच्याकडे वास्तव्यास आला तेव्हा त्याने स्वतःसोबत टायसनलाही आणले. घरातील एका बेडरूममध्ये सादिक, त्याचा मुलगा आणि टायसन राहत होते. वैवाहिक आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे सादिक दारूच्या आहारी गेला. त्यामुळे त्याचे टायसनकडे दुर्लक्ष झाले. सादिक बेरोजगार आहे. गेल्या महिनाभरापासून टायसन आजारी होता. त्यास परळ येथील रुग्णालयात किंवा खासगी क्लिनिकमध्ये नेण्याचा सल्ला सत्तार यांनी दिला होता; मात्र सादिकने त्याकडे दुर्लक्ष केले. शिवाय गेल्या दोनेक आठवड्यांपासून त्याला उपाशी ठेवले.
बेडरूमचे दार सतत बंद असल्याने आणि गेल्या काही दिवसांत सादिकसोबतचे संबंध बिघडल्याने सत्तार कुटुंबीयही हतबल होते. वर्षभरापासून टायसन गॅलरीत बांधलेल्या अवस्थेत होता. त्याला कधीच बाहेर फिरायला नेले नाही. तो गॅलरीतून भुंके, मात्र आजारपणात त्याचे भुंकणे विचित्र जाणवत होते, असे सत्तार यांनी सांगितले. सोमवारी दुपारी टायसन मेला, इतके सांगून सादिक घराबाहेर पडला. त्याचे अंत्यविधीही सादिकने केले नाहीत. तक्रार झाल्याबरोबर पोलिसांनी टायसनचा मृतदेह परळ येथील रुग्णालयात शवचिकित्सेसाठी पाठवला. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.